राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धूळ चारण्यासाठी काँग्रेस ने दिली भाजपसेनेला साथ
पुणे – पीएमपीच्या संचालकपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने अनपेक्षितरीत्या भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीला पाठिंबा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून स्थायी समितीच्या निवडणुकीचे उट्टे बुधवारी काढले. या निवडणुकीत सेनेचे विजय देशमुख ६२ मते मिळवून विजयी झाले. तर राष्ट्रवादीचे सुभाष जगताप यांना ५६ मते मिळाली. सभागृहनेते असलेल्या जगताप यांच्या पराभवामुळे महापालिकेतील सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसला नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे.
भाजप- शिवसेनेच्या उमेदवाराला ऐनवेळी पाठिंबा देऊन काँग्रेसने सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला. स्थायी समितीच्या निवडणुकीत आश्वासन देऊनही राष्ट्रवादी काँग्रेसने अध्यक्षपद दिले नव्हते तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा मिळवून काँग्रेसला इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही भाजप-शिवसेना युतीला पाठिंबा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाची ‘परतफेड’ केली. काँग्रेस, भाजप आणि शिवसेना यांनी त्यांच्या या निर्णयाबाबत इतकी गुप्तता बाळगली की, राष्ट्रवादी आणि मनसेला त्याची गंधवार्ताही लागली नाही. देशमुख हे हडपसरमधील प्रभाग क्रमांक ४४ ब मधून निवडून आले आहेत. पीएमपीचे संचालक म्हणून त्यांना एक वर्षांसाठी जबाबदारी मिळाली आहे.
पीएमपीच्या संचालकपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिलीप बराटे, बंडू केमसे यांच्या नावांची चर्चा होती. परंतु, सभागृहनेते सुभाष जगताप यांना अनपेक्षितपणे उमेदवारी दिली. सभागृहात निवडणूक जाहीर झाल्यावर काँग्रेसने संजय बालगुडे, मनसेने किशोर शिंदे, भाजपने माधुरी सहस्रबुद्धे, तर शिवसेनेने विजय देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली. नगरसचिव सुनील पारखी यांनी पक्षनिहाय मतदान घेतले. प्रथम जगताप यांच्यासाठी मतदान पुकारल्यावर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व म्हणजे ५६ सदस्यांची मते मिळाली. त्यानंतर मनसेचे शिंदे यांना त्यांच्या पक्षाच्या सदस्यांची म्हणजे २३ मते मिळाली. त्यानंतर शिवसेनेचे देशमुख यांच्यासाठी मतदान घेण्यात आल्यावर भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांनी हात वर करून त्यांना मतदान केले.