पुणे- शेरो शायरी, आवाज, धून ,संगीत आणि विविध भावना व्यक्त करणाऱ्या रचनांनी घायाळ करणाऱ्या फिल्मी
कव्वाली व सुफी गाण्यांच्या महेफिलीने पुणे नवरात्रौ महोत्सवात रंगत आणली.
पुणे नवरात्रौ महोत्सव अंतर्गत श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे गुरुवारी संध्याकाळी संदीप पंचवाटकर निर्मित फिल्मी
कव्वाली व सुफी गाणांच्या महेफिलीचा ‘जुनून’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गायकांनी गायलेल्या
कव्वाली व सुफी गाण्यांना प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत व रुमाल उडवत दिलेली साथ, शिट्या आणि वन्समोअरने रंगमंच
दणाणून सोडले.
‘जमाने मे कहा, तुटी हुई तसबीर बनती है…,’ या कव्वालीने या कार्यक्रमाचा आरंभ झाला आणि त्यानंतर ‘निगाहे
मिलाने को जी चाहता है ..’, ‘देखते रहेते तुझको सांज सबेरे…’, ‘ दिलने पुकारा और हम चले आये…’, ‘ख्वाजा मेरे
ख्वाजा…दिल मे समा जा..’, ‘ किसी नजर को मेरा आजभी इंतजार है..’, या प्रेमाचा अविष्कार व्यक्त करणाऱ्या कवाली
व सुफी गीतांनी रसिकांचे कान तृप्त केले. ‘पडदा है…पडदा है…’, ‘यारी है ये इमान मेरा यार मेरी जिंदगी…’, ‘झुमका
गिरा रे..’, हे लोकसंगीतावर आधारित गीत, मैत्रीची महती व्यक्त करणारी ‘ यारी है इमान मेरा, यार मेरी जिंदगी..’, ही
कव्वाली, विरह व्यक्त करणारे ‘ओठो पे आई तेरी जान … लंबी जुदाई..’, तर ‘तुम इतना जो मुस्करा रहे हो…’, अशा
गीतांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले.
राजू जाधव, विवेक पांडे या गायकांनी व मेधा परांजपे, सोनाली नांदुरकर या गायिकांनी ही कव्वाली व सुफी गाणी
गायली. त्यांना तबल्यावर गोविंद कुडाळकर, ढोलकीवर राजन साळवी, ड्रम मशीनवर आसिफ इनामदार तर कीबोर्डवर
सईद खान यांनी साथ दिली.
पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संयोजक अध्यक्ष उपमहापौर आबा बागुल व पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ.
जयश्री बागुल यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला पोस्ट व टेलिकॉम सोसायटीच्या सचिव
सौ. रेखा दैठणकर यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी पुणे नवरात्रौ महोत्सवाचे सचिव घनश्याम सावंत,नंदकुमार
कोंढाळकर, कोषाध्यक्ष नंदकुमार बानगुडे, रमेश भंडारी, राजू बडगे, अमित बागुल, सागर आरोळे, श्रीकांत बागुल, राजेंद्र
बागुल हे उपस्थित होते.