पुणे – गंजलेल्या पत्र्यांच्या डब्यातून विक्रीसाठी आणलेला११लाख ६७हजार रुपयांचे पनीर आणि मलईचा साठा रविवारी जप्त करून नष्ट करण्यात आला. कर्नाटकातून पुण्यात अन्नपदार्थ विक्रीसाठी आणणारी नवीन साखळी निर्माण होत असल्याची धक्कादायक माहिती अन्न व औषध द्रव्य प्रशासनाच्या (एफडीए) या कारवाईतून पुढे आली आहे.
बुधवार पेठेतील श्रीनाथ चित्रपटगृहाजवळ बेकायदा भेसळयुक्त अन्नपदार्थ घेऊन ट्रक येणार असल्याची माहिती “एफडीए‘ला मिळाली होती. त्या आधारावर सकाळी साडेसहा वाजता येथे सापळा रचण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या क्रमांकाचा ट्रक तेथे येताना मालाची तपासणी सुरू केली. त्यात गंजलेल्या पत्र्यांच्या डब्यांमध्ये पनीर ठेवले होते; तर प्लॅस्टिकच्या कंटेनरमधून मलईची वाहतूक करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले.
याबाबत “एफडीए‘च्या पुणे विभागाचे सहआयुक्त शशिकांत केकरे म्हणाले, की या कारवाईत ११ लाख ६७ हजार ६६०रुपयांचा माल जप्त केला आहे. त्यात सहा हजार ४७८किलो पनीर आणि६६४ किलो मलईचा समावेश आहे. हा सर्व साठा नष्ट केला आहे. या अन्नपदार्थांचे नमुने राज्य आरोग्य प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येतील. त्याचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल.
“एफडीए‘चे सहायक आयुक्त दिलीप संगत म्हणाले, की कर्नाटकातील हूडची या गावातून पनीर आणि मलई ट्रकने आणली होती. त्याची कोणतीही बिले नाहीत. विक्री होण्यापूर्वीच हा साठा नष्ट करण्यात आला. सहायक आयुक्त संजय नारागुडे यांच्यासह अन्नसुरक्षा अधिकारी योगेश ढाणे, राजेंद्र काकडे आणि बाळासाहेब कोतकर यांनी ही कारवाई केली.