‘कॉमेडी नाईटस् विथ कपिल’ या कॉमेडी शोद्वारे जगभरात नावारूपाला आलेला कलाकार कपिल शर्मा लवकरच मराठी चित्रपटाची निर्मीती करणार आहे. त्याच्या कारकिर्दीतील पहिलाच चित्रपट ‘किस किस को प्यार करू’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो नुकताच पुण्यात आला होता. ‘सीजन’ मॉल येथील ‘किवा ब्रेव’ पब येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांने हि माहिती दिली. तो पुढे असे हि म्हणाला की, मी लवकरच मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असून त्या चित्रपटात अभिनय देखील करणार आहे.
दहा वर्षांपासून मी मुंबईत राहतोय. अनेक मराठी कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्याबरोबर काम करण्याचा योग अनेक वेळा येतो. त्यांच्या बरोबर मी मला जमेल तसे मराठीत बोलतो. ‘किस किस को प्यार करू’ या चित्रपटात माझ्या बरोबर दोन मराठी अभिनेत्री आहेत. सई लोकूर व मंजिरी फडणीस यांच्या बरोबर मी शुटींग दरम्यान मराठीत बोलायचो. सई लोकूरने मला मराठीचे धडे दिले. कपिलने आवर्जून सांगितले की मराठी चित्रपटांचा मी चाहता आहे.
मराठी चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कार, ऑस्कर पर्येंत धडक मारली आहे. मराठी चित्रपट आशयघन असतात. मी मराठीच्या प्रेमात असल्याने लवकरच मराठी चित्रपट काढणार आहे. मराठीतले ग्रेट कॉमेडीयन दादा कोंडके मला आवडतात. मराठी लोक खूप प्रेमळ आहेत. ‘किस किस को प्यार करू’ हा माझा चित्रपट आवर्जून पहा. या चित्रपटासाठी मी आणि आमच्या टीमने खूप मेहनत घेतली आहे. जसे तुम्ही मला छोटया पडद्यावर स्विकारले तसेच मोठ्या पडद्यावर स्विकारावे असे त्याने आवाहन पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.