बंगळुरु – कन्नड बोलण्याची सक्ती करुन येथे एका मणिपुरी विद्यार्थ्यावर हल्ला करून त्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. मंगळवारी उशिरा रात्री ही घटना घडली. मारहाण झालेला मणिपुरी युवक हा विद्यार्थी नेता असल्याचे कळते. हल्लेखोरांनी त्याला कन्नड बोलण्याची सक्ती केली. हा चीन नाही भारत आहे, असे म्हणत त्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे, मात्र त्यांची ओळख अजून पटलेली नाही.हल्लेखोरांना स्थानिक नेत्यांची चिथावणी असल्याचे बोलले जाते
विद्यार्थी नेता टी मायकल लम्झाथांग हाऊकिप (वय २६) याच्यावर मंगळवारी उशिरा रात्री कोथानूर भागात हल्ला करण्यात आला. कोथानूर या भागात प्रामुख्याने परदेशातील आणि परराज्यातील विद्यार्थी राहातात. येथे आधीही असे हल्ले झाले आहेत. जखमी विद्यार्थी हाऊकिप मणिपूरी विद्यार्थी संघटना ‘थाडाऊ’चा नेता असल्याचे सांगितले जात आहे. त्याचा डोक्याला आणि पाठीला जबर मार लागला आहे. आता त्याची प्रकृती स्थिर असून त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या नगमखोलन हाउकिप आणि रॉकी किपजेन या दोन विद्यार्थ्यांनाही मारहाण झाली आहे. नगमखोलन (वय २८) या विद्यार्थ्यावर गेल्या महिन्यातच असा हल्ला झाला होता. तेव्हाही पोलिसांनी गुन्हा दाखल करुन काही जणांना ताब्यात घेतले होते. मात्र, परप्रांतियांवर होणारे हल्ले वाढल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे.