पुणे – ‘दाभोलकर- पानसरेंचा खून झाला, महाराष्ट्राची लाज गेली‘, अशी घोषणा देऊन अंद्धश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांनी गुरुवारी अभिवादन फेरी काढली. महाराष्ट्रभर दाभोलकरांच्या स्मृतीला उजाळा देत वेगवेगळ्या स्वरुपाची अभियाने विविध शहरात गावांमधून राबविण्यातआली वर्धा, नंदुरबार,धुळे,औरंगाबाद, अह्मदनगर, बीड़, सोलापूर, जळगाव,नाशिक, लातूर,उस्मानाबाद,नांदेड, कोल्हापुर,सातारा इतर अनेक ठिकाणी आंदोलन,मोर्चे, कार्यक्रम घेण्यात आले सगळीकडून एकाच सूर होता’ कधी पकडणार दाभोळकर-पानसरे यांचे मारेकरी … कोण आहेत सूत्रधार ?
पुण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त काढलेल्या या फेरीची सुरवात ज्येष्ठ विचारवंत एन. डी. पाटील, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, पत्रकार निखिल वागळे, दिग्दर्शक नागराज मंजुळे, मुक्ता दाभोलकर, हमीद दाभोलकर यांच्या उपस्थितीत झाली.
अंनिसच्या कलाकारांनी फेरीच्या सुरवातीस “सॉक्रेटिस ते दाभोलकर, पानसरे व्हाया तुकाराम‘ हे रिंगणनाट्य सादर करून विवेकवादाचा जागर केला. विठ्ठल रामजी शिंदे पूल येथून महापालिका, शनिवारवाडा, लक्ष्मी रस्ता, शास्त्री रस्ता ते म्हात्रे पुलामार्गे निघालेल्या फेरीची मनोहर मंगल कार्यालय येथे सांगता झाली.
डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला दोन वर्षे पूर्ण होऊनदेखील आरोपींना पकडण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. याचा उपस्थितांनी निषेध केला. “शाहू, फुले, आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर‘, “लडेंगे, जितेंगे‘ “कितना दम है तेरी गोली में, देखा है, देखेंगे‘, आदी घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. हमीद दाभोलकर म्हणाले, “शेवटपर्यंत लोकशाही मार्गाने हा लढा सुरू राहील. पोलिसांकडून खुनाच्या तपासात दिरंगाई होत असून, महाराष्ट्रातील जनता संतप्त आहे. त्यांना यामागील सरकारची भूमिका पटलेली नाही. त्यामुळेच या लढ्याला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळत असून, येत्या काळात सनदशीर मार्गाने हा लढा अधिक जोमाने पुढे नेऊ.‘‘






