कचरा निर्मूलन नागरिकांची चळवळ झाली पाहिजे – कुणाल कुमार
पुणे -शहरातील कचरा निर्मूलन यशस्वी करणेकरिता सर्व स्तरातील नागरिकांच्या सहभागाने ही चळवळ यशस्वी झाली पाहिजे असे प्रतिपादन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी केले.
पुणे महानगरपालिकेच्या वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या आवारात कचरा प्रक्रिया तंत्रज्ञान प्रदर्शनाचे आयोजन वारजे कर्वेनगर व कोथरुड क्षेत्रिय कार्यालयाचे वतीने आयोजित करणेत आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांचे हस्ते संपन्न झाले.
प्रदर्शनातील माहिती स्टॉल्सवर महापालिका आयुक्त तसेच उपस्थित पदाधिकारी व सभासद यांनी भेट देऊन सविस्तर माहिती घेतली.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना कुणाल कुमार यांनी सांगितले की पुणे शहरातील कचरा निर्मूलनाकरिता प्रशासनाचे वतीने विविध स्तरांवरुन यशस्वी प्रयत्न होत आहेत. त्या दृष्टीने अशा कचरा प्रक्रिया तंत्रज्ञान माहिती मार्गदर्शनानुसार प्रदर्शनास या परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन माहिती घ्यावी. विविध माहिती व मार्गदर्शन घेऊन आपआपल्या सोसायट्या, अपार्टमेंट, वसाहतीमधून अंमलबजावणी करुन परिसरातील कचरा परिसरात जिरविण्यात यावा. बऱ्याच ठिकाणी असे प्रयोग यशस्वी झालेले आहेत. नागरी सहभागाने हे शक्य आहे. त्यामुळे कचरा समस्यांवर मात करणेसाठी कचरा निर्मूलन ही एक नागरिकांच्या दृष्टीने प्रभावी चळवळ झाली पाहिजे.
पुण्यामध्ये विकास कामांचे विविध प्रयोग यशस्वी होतात व त्याची चर्चा देशभर होत असते. अशा प्रदर्शनास भेट देऊन कचरा निर्मूलन अंमलबजावणी केल्यास कचरा निर्मूलनास मोठ्या प्रमाणावर मदत होऊ शकते. अशा योजना, जनजागृती, माहिती प्रसार राबविताना कचरा निर्मूलनात व अग्रेसर रहाणाèयांना बक्षिस योजनांद्वारे प्रोस्ताहित करण्यात येईल. आयोजित करणेत आलेल्या या प्रदर्शनास या परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच पुणे शहराच्या कचरा प्रश्नावर मात करण्यास सर्वांनी सहकार्य करण्याचे त्यांनी याप्रसंगी सर्वांना आवाहन केले.
सभागृह नेते बंडू केमसे यांनी सांगितले की, कचरा समस्या निर्मूलन करणेकरिता नागरी सहभागाची ही लोकचळवळ आहे. नागरी सहभाग यात महत्वाचा आहे. पुणे शहरातील कचरा निर्मूलन, सॅनिटेशन, विविध विकास योजना, स्मार्ट सिटी संदर्भात दिल्लीमध्ये मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मा. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी माहिती सादर करताना मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व माहिती घेतली. तसेच याबाबत गौरवोद्गार काढले. त्यामुळे पुणे शहरात राबविण्यात येणाऱ्या योजना पुणेकर नागरिक स्विकारतात व सहभागी होतात ही एक चांगली मानसिकता आहे. त्यामुळे कचरा निर्मूलनासारख्या चळवळीत पुणेकर पूर्णपणे सहकार्य करतील असे त्यांनी सांगितले.
नाट्यचित्रपट कलाकार व संगीतकार सलील कुलकर्णी यांनी या प्रदर्शनाचे कौतुक करताना सांगितले की, अशा प्रकारच्या संकल्पना व प्रयोग व येथील माहितीचा प्रसार व अंमलबजावणी करावयाच्या दृष्टीने नागरिकांबरोबरच शालेय विद्याथ्र्यांना जास्तीत जास्त माहिती व मार्गदर्शन केले पाहिजे, लहान मुलांपर्यंत ही चळवळ पोहोचली पाहिजे, पुण्यातील कचरा नियोजन करणे हे आपले सर्वांचेच कर्तव्य आहे. आपण सर्वांनी मिळून एकत्रितरित्या ते यशस्वी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
चित्रपट कलाकार रमेश परदेशी यांनी प्रदर्शनास भेट देऊन माहिती घेताना सांगितले की, सदरचा उपक्रम अतिशय स्तूत्य असून कचरा निर्मूलनाकरिता सर्वांनी सहभागी होणे आवश्यक आहे. नागरिकरण मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे प्रशासनावरही ताण येत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी जबाबदारी ओळखून यामध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. या मोहिमेत कलाकारही मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आयोजित करणेत आलेल्या प्रदर्शना संदर्भात महापालिका सहाय्यक आयुक्त उमेश माळी व अविनाश संकपाळ यांनी सांगितले की, प्रदर्शनास नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून दोन्ही क्षेत्रिय कार्यालयांच्या परिसरा अंतर्गत विविध संस्था, मंडळे, नागरिक व कर्मचारी एकत्रितरित्या अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सतर्क आहेत. या प्रदर्शनात सुमारे २४ कंपन्या, संस्थांनी सहभाग घेतलेला असून सदरचे प्रदर्शन दि. ९/८/२०१५ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत नागरिकांकरिता विनामूल्य खुले रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी कोथरुड क्षेत्रिय कार्यालयाच्या प्रभाग अध्यक्षा मा. सौ. जयश्री मारणे, वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या प्रभाग अध्यक्षा सौ. भाग्यश्री दांगट, श्रीमती लक्ष्मीताई दुधाणे. श्रीमती सुरेखा मकवाना, . प्रशांत बधे, पृथ्वीराज सुतार, योगेश मोकाटे, राजाभाऊ बराटे, सचिन दोडके, . श्रीमती पुष्पलता कनोजिया, मृणाल ववले, संजय भोर, सचिन दांगट व अन्य सभासद तसेच अतिरिक्त महापालिका आयुक्त (वि) ओमप्रकाश बकोरिया, उपायुक्त सुनिल केसरी, महापालिका सहाय्यक आयुक्त उमेश माळी, अविनाश संकपाळ, नितीन उदास, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी प्रशांत इनामदार व अन्य सदस्य तसेच विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, प्रदर्शनात सहभागी संस्था, कंपन्या यांचे प्रतिनिधी कोथरुड व वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन दिपक ढैलवान यांनी केले तर आभार प्रदर्शन योगेश मोकाटे यांनी केले.