महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात क्रांती घडवणारी कथा असलेल्या कँडल
मार्चचे चित्रिकरण आणि पोस्ट प्रॉडक्शन चाणक्य क्रिएशन्सने पूर्ण केले असून
२८ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे चाणक्य क्रिएशन्स,
के4 एन्टरप्रायझेस ने या चित्रपटाची निर्मिती केली आहे
भारतातील सामाजिक प्रश्न धोरणकर्त्यांच्या नजरेस आणून ते सोडवण्याच्या
उद्देशाने चाणक्य क्रिएशन्सची स्थापना झाली. या उपक्रमाच्या माध्यमातून,
चाणक्य क्रिएशन्स एरवी दुर्लक्षिल्या जाणाऱ्या सामाजिक समस्या
सोडवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देणार आहे.
‘कँडल मार्च’, हा एक सत्य घटनेवर आधारित मराठी चित्रपट असून त्याची
कथा लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरलेल्या चार महिला नायिकांच्या भोवती
फिरत राहते. घटनांची एक शृंखला तयार होतो ज्यामुळे चारही नायिका व्यवस्था
आणि अन्यायाविरोधात लढण्यासाठी एकत्र येतात. भारतात घडलेल्या लैंगिक
अत्याचाराच्या घटनांवर आधारलेली ही कथा असून यात तेजस्विनी पंडित,
स्मिता तांबे, मनवा नाईक आणि सायली सहस्रबुध्दे यांनी आशिष पाथाडे
यांच्यासह उत्तम भूमिका साकारल्या आहेत. समाजाची एक काळी बाजू
दाखवणाऱ्या खलनायकाची भूमिका निलेश दिवेकर यांनी साकारली आहे.
संपूर्ण कथा अतिशय सुंदरपणे पडद्यावर उभी केली आहे ती दिग्दर्शक सचिन
देव यांनी तर सचिन दरेकर आणि सचिन देव यांनी पटकथा लिहीली आहे.
चित्रपटाची संकल्पना आणि हृदयस्पर्शी संवाद सचिन दरेकर यांनीच लिहीले
आहेत. मंदार चोलकर यांच्या शब्दांना अमितराज यांनी सूरसाज चढवला आहे.
तसेच वास्तवदर्शी चित्रण छायालेखक राजा सातणकर यांनी केले आहे तर कला
दिग्दर्शन संतोष फुटाणे यांचे आहे. चित्रपटाचा कणा निर्माते अंजली आणि
निलेश गावडे आहेत.