पुणे : वाहन उद्योगाचे विकसित तंत्रज्ञान आणि बाजारपेठेसाठी संपूर्ण जगाचे लक्ष भारतावर केंद्रित झाले आहे. जगाला या क्षेत्राच्या बाबतीत भारताकडून अपेक्षा आहेत. त्या दृष्टिकोनातून ऑटोमोटीव्ह रिसर्च असोसिएशनमार्फत केल्या जाणाऱ्या संशोधनामुळे वाहन उद्योग विश्वाच्या अपेक्षा पूर्ण होतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
येथील ऑटोमोटीव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमास विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक डॉ. के. सिवन, एआरएआयच्या संचालिका रश्मी ऊर्ध्वरेषे, माजी संचालक अभय सिसोदिया, रवी चोप्रा आदी उपस्थित होते.
ऑटोमोटीव्ह रिसर्च असोसिएशन संस्थेमार्फत वाहन क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा विकास केला जात आहे. या संस्थेने प्रदूषण विरहित वाहनाच्या निर्मितीकडे टाकलेली झेप मोठी आहे. हे संशोधन भारतात विकसित आणि पुण्यात संशोधीत झाले असल्याने त्याला विशेष महत्व आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया कार्यक्रमास अनुसरुन विकसित तंत्रज्ञानामुळे वाहन उद्योगाच्या क्षेत्रात भारत जगातील महत्वाचे केंद्र होऊ शकते असेही, त्यांनी सांगितले.
सध्या वाहन उद्योगाच्या क्षेत्रातील तंत्रज्ञानामध्ये जपान, कोरिया, जर्मनी आणि अमेरिकेचे वर्चस्व आहे. भारतात या क्षेत्रात होत असलेली प्रगती व संशोधनामुळे आता जगाचे लक्ष लागले आहे. देशात 25 वर्षे वयाची सुमारे 50 टक्के लोकसंख्या आहे. या लोकसंख्येला कौशल्यपूर्ण शिक्षण देऊन मनुष्यबळ वापरात आणल्यास भारताचा जगातील विकसित देशाच्या यादीत समावेश होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
ऑटोमोटीव्ह रिसर्च असोसिएशनने विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळे वाहन उद्योगाच्या भावी वाढीसाठी हे उपयुक्त ठरणार आहेच. आपण गेली 50 वर्षे करत असलेल्या प्रयत्नातून आणि घेतलेल्या परिश्रमातून आपले स्वप्न वास्तवात येत आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र राज्यातील बदललेल्या हवामानाचा सर्वात मोठा फटका कृषि व्यवस्थेला बसला असून गेल्यावर्षी 25 हजार तर यावर्षी 15 हजार गावे दुष्काळग्रस्त ठरली आहेत. बदलत्या वातावरणावर विजय मिळविण्यासाठी चांगल्या तंत्रज्ञानाची आणि चांगल्या संशोधनाची गरज आहे.
विक्रम साराभाई स्पेस सेंटर तिरुअनंतपूरमचे संचालक डॉ. के. सिवन, एआरएआयच्या संचालिका रश्मी ऊर्ध्वरेषे, माजी संचालक अभय सिसोदिया, रवी चोप्रा यांनीही मनोगत व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एआरएआय कंपनीच्या सुवर्ण महोत्सवी लोगोचे अनावरण करण्यात आले.