मुख्यमंत्र्यांनी केली दुर्मिळ ग्रंथांची पाहणी
मुंबई : ग्रंथ हेच आपले गुरू आहेत, ग्रंथांच्या वाचनानेच अनेकांचा विकास झाला. म्हणून एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयातील हा दुर्मिळ ग्रंथांचा ठेवा अत्यंत महत्त्वाचा असून पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
मुंबईतील टाऊन हॉल येथील एशियाटिक सोसायटी ग्रंथालयाच्या वतीने महात्मा गांधी यांच्या जन्मदिनी दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाची मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी शुक्रवारी पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष शरद काळे, उपाध्यक्ष संजीवनी खरे, डॉ. मंगला सरदेशपांडे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी यांच्यासह ग्रंथालयाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भारतरत्न काणे हॉलमधील 15 व्या शतकापासूनच्या पुस्तकांची माहिती घेऊन पाहणी केली. शिवाय दुर्मिळ ग्रंथ व पुस्तकांच्या डिजिटल स्कॅनिंगबाबत माहिती घेतली. त्यानंतर ग्रंथालयातील दरबार हॉल येथे इ.स. 1350 पासूनच्या काळातील हस्तलिखिते, पुस्तके, चित्रे, नक्षीकाम यांची सविस्तर माहिती घेतली. इ.स. 1350 मधील दांते यांनी कातड्यावर लिहिलेली इटालियन भाषेतील देवाविषयींची गाथा (Divine comedy), इ. स. 1516 मधील महाभारतासंबंधित हस्तलिखित अरण्यक पर्व, इ. स. 1851 मधील मुद्रा (The Sundhya Or The daily prayers of the Brahmins), इ.स. 1874 मधील कपड्यावरील नक्षीकामांची माहिती सोसायटीचे अध्यक्ष श्री. काळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.