पणजी –
एलिझाबेथ एकादशी या चित्रपटाला होत असलेला विरोध हा निरर्थक असल्याची टीका चित्रपटाचे निर्माते नितीन केणी यांनी केली आहे. गोव्यामध्ये सुरू असलेल्या ४५व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) त्यांनी ही टीका केली.
‘भारतात कोणत्याही गोष्टीवर वाद निर्माण होऊ शकतो. ज्यांनी हा चित्रपट अद्याप पाहिलेलाच नाही, ते लोक याचा विरोध करीत आहेत. चित्रपटांमधून एखादी गोष्ट मांडताना काही गोष्टी प्रातिनिधिक स्वरूपात घेतल्या जातात. त्याचा धर्माशी काहीही संबंध नाही. त्यामुळे सध्याच्या काळात अशाप्रकारचे वाद उकरून काढणे हा मूर्खपणा आहे,’ असे केणी यांनी सांगितले. या चित्रपटाच्या नावामुळे वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या जात असल्याचे सांगून, हिंदु जनजागृती समितीने हा चित्रपट महोत्सवातून काढून टाकण्याची मागणी केली होती. दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणाले की, आपल्या आवडत्या वस्तूंना नाव देण्याची लहान मुलांना सवय असते. त्याप्रमाणेच या चित्रपटातील मुलांनी आपल्या सायकलला एलिझाबेथ हे नाव दिले आहे. ही सायकल या चित्रपटात एक पात्र म्हणून वापरण्यात आली आहे.