पुणे- ‘एलिझाबेथ एकादशी‘ आणि ‘किल्ला‘ या चित्रपटांनी राज्य सरकारच्या ‘संत तुकाराम उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा‘वर, तर ‘बिहेवियर‘ने (क्यूबा) प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर नाव कोरले. तेराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची गुरुवारी उत्साहात सांगता झाली.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांत ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ आणि ‘यलो’ या सिनेमांनी बाजी मारली. ‘एक हजाराची नोट’ सिनेमातील भूमिकेसाठी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला
गेल्या आठवड्यापासून पुण्यात रंगलेल्या ‘पिफ‘चा समारोपही तितक्याच शानदार वातावरणात गुरुवारी झाला. सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते महोत्सवातील या पुरस्कारांचे वितरण झाले. दिग्दर्शक डेनेक टीक (झेक प्रजासत्ताक) यांना ‘लाइक नेव्हर बिफोर‘ चित्रपटासाठी आणि अलेक्झांडर कॉट (रशिया) यांना ‘टेस्ट‘ या चित्रपटासाठी विभागून ‘प्रभात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक पुरस्कार‘ प्रदान करण्यात आला. तसेच, संगीतकार आनंदजी शहा यांना ‘एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय पुरस्कारा‘ने गौरविण्यात आले. महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, दिग्दर्शक ख्रिस्तोफ झानुशी (पोलंड), अभिनेते डॉ. मोहन आगाशे, नाटककार सतीश आळेकर, समर नखाते उपस्थित होते.
तावडे म्हणाले, ‘‘मराठी चित्रपटांना पुढे आणण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. चित्रपटांसमोरील समस्या सोडविल्या जातील. दादासाहेब फाळके चित्रनगरीचे रूपही लवकरच बदलले जाईल. तेथे विविध भागांतील दिग्दर्शकांना चित्रपट निर्मितीसाठी योग्य वातावरण निर्माण केले जाईल.‘‘
शहा म्हणाले, ‘‘एस. डी. बर्मन यांचा लहानपणापासून मी चाहता आहे. त्यांचे गाणे डोळे बंद करून ऐकले तरी चित्र समोर उभे राहते, इतकी ताकद त्यांच्या गाण्यात होती. त्यांच्या नावाचा पुरस्कार खरोखरीच प्रेरणादायी आहे.‘‘
कल्याणजी- आनंदजी जोडीतील आनंदजी शहा यांची ओळख करून देणारी चित्रफीत या वेळी दाखविण्यात आली. त्यात त्यांच्या वेगवेगळ्या गाण्यांबरोबरच ‘पग घुंगरू नाचे…‘ या गाण्याचाही समावेश होता; पण ही चूक सांस्कृतिक मंत्री असलेले तावडे यांनी बरोबर ओळखली. ‘‘हे गाणे आनंदजी यांचे नसून बप्पी लहरी यांचे आहे. मी सांस्कृतिक मंत्री आहे, त्यामुळे मला या क्षेत्रातले कळते, हे आता तुम्हालाही कळले असेल,‘‘ अशी कोटीही तावडे यांनी केली.
राज्य सरकारचे भरघोस अनुदान मिळणारा ‘पिफ‘ पुढील वर्षापासून मुख्यमंत्र्यांच्या शहरात, अर्थात नागपूरमध्येही भरणार आहे. डॉ. पटेल यांनीच तशी घोषणा केली. त्यानंतर तावडे यांनी नागपूरमध्ये महोत्सव होणार, ही चांगली बाब आहे. यासह अनेक शहरांत, तालुक्यांतील रसिकांनाही चित्रपटांची भूक असते, त्यांनाही यात कसे सामावून घेता येईल, याचा विचार व्हावा, अशी सूचना केली.
सर्वोत्तम पारितोषिके पुढीलप्रमाणे-
“फोक्सवॅगन इंटरनॅशनल स्टुडंट्स कॉम्पिटिशन- लाइव्ह ऍक्शन‘-
चित्रपट : “सनी‘ (जर्मनी)
दिग्दर्शन : सोफिया ग्विलर (रशिया)
छायाचित्रण : जू हुजी (चीन)
ऑडिओग्राफी : एफटीआयआय (पुणे)
भारतीय ऍनिमेशन चित्रपट : “मगरवासी‘
आंतरराष्ट्रीय ऍनिमेशन चित्रपट : “हॅरॉल्ड‘ (जर्मनी)
“पिफ‘ विशेष पारितोषिक- एफटीआयआयच्या अंतिम वर्षाचा (दिग्दर्शन) विद्यार्थी सार्थक भसिन याला.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सर्वोत्तम मराठी चित्रपट दिग्दर्शक : भाऊराव खराडे (चित्रपट- ख्वाडा)
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सर्वोत्तम मराठी अभिनेत्री : उषा नाईक (चित्रपट- एक हजाराची नोट)
पिफ-2015 सर्वोत्तम मराठी चित्रपट (प्रेक्षकांची पसंती) : “सलाम‘
एमटीडीसी लघुपट स्पर्धा-
अ) कल्चर ऑफ महाराष्ट्र “ओडिसी-अनफोल्डिंग महाराष्ट्रा‘ (प्रथम), “संगीत गोविंद गौरव‘ (द्वितीय), “इन्स्पिरेशन ऑफ कोल्हापूर‘ (तृतीय)
ब) नॅचरल हेरिटेज
“निघोज‘ (प्रथम), “द एनिग्मा ऑफ लोणार‘ (द्वितीय), “द सिल्व्हर-गोल्डन बीच‘ (तृतीय)
क) मॅन मेड हेरिटेज “सिरेंडिपिटी‘ (प्रथम), “ऍडोरेबल लिटल हॅम्लेट-वाई‘ (द्वितीय), “केदारेश्वर टेंपल‘ (तृतीय)
स्पेशल ज्यूरी ऍवॉर्ड : टिझीटा हेगेअर (बालकलाकार, इथिओपिया)
द स्पेशल मेन्शन : सॅमन्था कॅस्टिलो (अभिनेत्री, व्हेनेझुएला) व मुश्फिक हातामोव्ह (निर्माता, अझरबैजान)
पिफ-2015 सर्वोत्तम जागतिक सिनेमा (प्रेक्षकांची पसंती) : “टेस्ट‘ (रशिया)