पुणे, : सरकार पुरस्कृत डोमेस्टिक इफिशियंट लायटिंग प्रोग्राम () अंतर्गत घरगुती ग्राहकांना वितरीत होणारे बल्ब प्रत्येकी 100 रुपयांत उपलब्ध आहे. त्यापेक्षा चढ्या दराने या बल्बची विक्री होत असल्यास एनर्जी एफिशियंसी सर्व्हीसेस लिमिटेडच्या (ईईएसएल) अधिकार्यांना माहिती देण्यात यावी असे आवाहन महावितरणने केले आहे.
सरकारच्या ईईएसएल या कंपनीकडून पुणे शहर व काही ग्रामीण भागात महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांना एलईडी बल्ब वितरणाचे काम सुरु झाले आहे. एलईडीच्या एका बल्बची किंमत 100 रुपये असताना राजगुरुनगर येथे एका ठिकाणी चढ्या दराने बल्बची विक्री होत असल्याचा प्रकार महावितरणच्या कर्मचार्याच्या निदर्शनास आला आहे. याबाबत ईईएसएल कंपनीला महावितरणने माहिती दिली असून नियमानुसार कारवाई करण्यास सांगितले आहे. वीजग्राहकांनी प्रत्येकी 100 रुपये दरानेच एलईडी बल्बची खरेदी करावी व त्यापेक्षा अधिक किंमतीत विक्री होत असल्यास त्याची माहिती ईईएसएलचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दीपक कोकाटे (मोबा. 9867978106), श्री. सचिन शर्मा (मोबा. 8450913582) किंवा ईईएसएलच्या 7841929103 किंवा 9657884191 या कॉल सेंटरच्या क्रमांकावर माहिती देण्यात यावी, असे आवाहन मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांनी केले आहे.
या योजनेतून प्रत्येक घरगुती वीजग्राहकाला प्रत्येकी 7 वॅटचे एकूण 10 एलईडी बल्ब वितरीत करण्यात येणार आहे. 100 रुपयांचा एक बल्ब असे एकूण 10 बल्ब रोक्ष्ख रक्कमेतून एकाच वेळी खरेदी करता येईल. यात हप्त्यांची योजना असून वीजग्राहकांना 10 पैकी जास्तीत जास्त 4 एलईडी बल्ब हे प्रत्येकी 10 रुपये अॅडव्हॉन्स भरून खरेदी करता येईल व या 4 बल्बची उर्वरित रक्कम 10 हप्त्यांत वीजदेयकातून भरावी लागणार आहे. या बल्बची तीन वर्षांची वारंटी असून वारंटी पिरेडमध्ये नादुरुस्त झालेला बल्ब बदलून मिळणार आहे. एलईडी बल्बची खरेदी केल्यानंतर त्याची वीजग्राहकांनी पावती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

