पुणे :
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि ‘बीव्हीजी इंडिया लिमिटेड’ या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणार्या ‘महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’च्या ‘डायल 108’ च्या 10 सुसज्ज रूग्णवाहिका एकवीरा यात्रेत भाविकांच्या सेवेसाठी दाखल झाल्या आहेत.
लोणावळाजवळील वेहेरगांव कार्ला येथील श्री एकवीरा देवीच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्रातील लाखो भाविक दर्शनासाठी गडावर येतात. दिनांक 26 व 27 मार्च 2015 रोजी ही यात्रा होत असून, येणार्या भाविकांना आपत्कालीन सेवेसाठी आणि तपासणीसाठी रूग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती ‘बी.व्ही.जी. इंडिया’चे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. ज्ञानेश्वर शेळके आणि विभागीय अधिकारी डॉ. विनय यादव यांनी दिली.
‘108’ हा दूरध्वनी डायल केल्यानंतर ‘महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस’च्या सुसज्ज रुग्णवाहिका मदतीला येतात. यात्रेदरम्यान वेळेवर तातडीचे वैद्यकिय उपचार देण्यासाठी ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.
‘डायल 108’ रूग्णवाहिकांमध्ये व्हेंटीलेटर (कृत्रिम श्वसन) अशी आधुनिक वैद्यकीय उपकरणे आहेत. रुग्णालयात पोहोचेपर्यंत आपत्कालीन उपचार करण्यासाठी या रुग्णवाहिकेत डॉक्टर आणि सहाय्यकही असणार आहेत. ही सेवा विनामूल्य आहे.
‘26 जानेवारी 2014 रोजी सुरू झालेल्या या सेवेत अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा 937 रुग्णवाहिका राज्यभर आहेत. फेबु्वारी 2015 पर्यंतच्या तपशीलानुसार 2 लाख 40 हजार 790 जणांना अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवेचा लाभ मिळाला आहे.