पुणे :
पावकी -निमकी पाढे “अंकनाद’ ऍपद्वारे पुन्हा भेटीस आले असून, “निर्मिती इपिक’ या संस्थेद्वारे त्याचे पुनरूज्जीवन करण्यात आले आहे. प्रा. प्र. चि.शेजवलकर, “कॉलेज ऑफ इंजिनियरींग’ चे प्राचार्य डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे आणि ऍड. अजय वाघ (रोटरी क्लब डिस्ट्रीक्ट 3131 चे रोटेरियन युथ डायरेक्टर) यांच्या हस्ते मंगळवार, दिनांक 21 एप्रिल रोजी “लोकमान्य टिळक संग्रहालय’ (केसरी वाडा) येथे या ऍपचे उद्घाटन झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदार नामजोशी यांनी केले.
यावेळी बोलताना शेजवलकर म्हणाले, “सध्या शालेय स्तरावर पाठांतर कमी होत आहे हे योग्य नाही. आता अंकनाद मोबाइल ऍप्लिकेशनद्वारे मुलांना हसत खेळत पाढे पाठांतर करता येणार आहे. हा उपक्रम कौतुकास्पद आहे.
ऍड. अजय वाघ म्हणाले, “बदलत्या तंत्रज्ञानचा वापर करून “अंकनाद’ या ऍप्लिकेशनद्वारे पाढे पाठांतर विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे.’
या ऍप विषयी माहिती देताना सौ. निर्मिती नामजोशी म्हणाल्या, “गणित हा विषय कोष्टकांवर अवलंबून असतो. “बे एके बे’, “बे दुणे चार’, “बेत्रिक…..’पाढे ! याप्रमाणे मराठी भाषेने पावकी निमकी, सवाकी, दीडकी एकत्र अशी तयार केलेली ही अष्टके म्हणजे विश्वाला दिलेली देणगी होय. याच्या वापरातून उच्चार शास्त्रावर, स्मरणशक्तीवर आणि आत्मविश्वासावर निश्चित परिणाम होतो. हा ज्ञानठेवा आजकाल शाळांमधून तसेच घरांमधून नामशेष झाला आहे. गणकयंत्राच्या अथवा संगणकाच्या अधीन झाल्याने आपल्या मेंदूच्या क्षमतेचा वापर कमी झाला आहे. “अंकनाद’ हे मोबाइल ऍप आपल्यापर्यंत आम्ही संगीतबद्ध करून आणले आहे.
“अंकनाद’ या ऍप्लिकेशनद्वारे बालवाडीपासून ते पदवी पश्चात शिकणाऱ्यांसाठी हे ऍप्लिकेशन उपयुक्त आहे.’
सौ. निर्मिती नामजोशी यांनी या “अंकनाद ऍप’ला संगीतबद्ध केले आहे. श्रृती आवटे या लेखिकेने या पाढ्यांना स्वर साज चढविलेला आहे. अपूर्वा धराधर आणि प्रियंका डोळे यांनीसुद्धा स्वर दिला आहे.


