पुणे – ऊसदराच्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. शेतकऱयांच्या ऊसाला ‘एफआरपी’नुसार भाव द्यावा, अशी मागणी करीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज पुण्यातील साखर संकुलात तोडफोड केली. दरम्यान, ऊसदर प्रश्नी सरकारने जबाबदारी झटकलेली नाही, याविषयावर चर्चा करण्याचे आश्वासन राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात आंदोलन केले. ऊसदरावरून आक्रमक झालेल्या कार्यकर्त्याकडून साखर संकुलाची तोडफोड केली.
या आंदोलनाविषयी माहिती देताना राजू शेट्टी म्हणाले की, शेतकऱ्याला न्याय देण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. त्यामुळे आम्ही भाजपला पाठिंबा दिला. आमच्या सहकार्यामुळेच राज्यात सत्तापरिवर्तन झाले आहे. नव्या सरकारने ऊस दर निश्चितीसाठी समिती स्थापन केली आहे. या समितीत माझाही समावेश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकार किमान प्रयत्नशील असल्याचे दिसते. मागील सरकार हेसुद्धा करत नव्हते.
सरकारच्या योग्य निर्णयाची आम्ही वाट पहात आहोत. शेतकऱ्यांना ‘एफआरपी’नुसार दर देण्याचे आदेश देऊनही कारखानदारांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. सरकारने या कारखानदारांवर कारवाई करावी. जर सरकारने याकडे दुर्लक्ष केले तर आम्ही सरकारविरोधात रस्त्यावर उतरू, काँग्रेसप्रणीत सरकारला खाली खेचण्यासाठी १५ वर्षे लागली. मात्र, भाजपप्रणीत सरकार १५ महिन्यात खाली खेचू असा इशाराही शेट्टी यांनी सरकारला या वेळी दिला.
दरम्यान, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने असून, ऊसदराबाबत उद्यापासून चर्चा करण्याचे आश्वासन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.