पुणे- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्या घराण्याची कुलदैवत कार्ल्यातील एकवीरा देवीच्या दर्शनाला मंगळवारी येत आहेत. त्यांच्यासमवेत विधानसभेत निवडून आलेले सर्व ६३ आमदारही एकवीरा देवीचे दर्शन घेतील, अशी माहिती शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गो-हे यांनी येथे दिली.
उद्धव ठाकरे यांनी रविवारीच कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेऊन नवस फेडला. विधानसभेत चांगले यश मिळू दे, निवडून आलेल्या सर्व आमदारांना तुझ्या दर्शनाला घेऊन येईन असे उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरच्या अंबाबाई व कार्ल्यातील एकवीरा देवीला नवस केला होता. विधानसभेत शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नसले तरी एकट्याच्या बळावर चांगलेच यश मिळाले असे मानले जात आहे. लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेचे १८खासदार निवडून आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्या सर्वांना एकवीरा देवीच्या दर्शनाला आणले होते.
विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी कोल्हापूरातील करवीरनिवासिनी श्री अंबाबाईला ठाकरे यांनी साकडे घातले होते. यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी६ जागांवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. त्या सर्व आमदारांना घेऊन ठाकरे यांनी रविवारी सपत्नीक अंबाबाईचे दर्शन घेतले.