महाराष्ट्रातील सत्ता मिळवण्यासाठी शिवसेना-भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला आता सुवर्णसंधी आहे, असे बोलले जात असले तरी मुंबईसारख्या आर्थिक राजधानीचे शहर असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भाजपकडेच असावे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा असल्याने व मुंबईतील गुजराती समाजालाही शिवसेनेचा मुख्यमंत्री नको असल्याने युतीवर ‘पाणी’ सोडण्याची पूर्ण तयारी भाजपने केल्याचे विश्वसनीय गोटातून सोमवारी सांगण्यात आले. त्यामुळे २५ वर्षांची युती तुटण्याची घडी समीप येत असून आज, मंगळवारी याबाबत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे जावे, अशी मुंबईतील गुजराती समुदायाची इच्छा नाही. हे पद भाजपकडेच असले पाहिजे, असा आग्रह त्यांनी मोदी व अमित शाह यांच्याकडे धरल्याचे समजते. मात्र, मुख्यमंत्रिपद मिळावे म्हणून आम्ही युतीत तणाव निर्माण केलेला नाही, असे भाजपकडून सांगण्यात येत आहे.
भाजपने रविवारच्या बैठकीत उमेदवारांच्या दोन याद्या सज्ज केल्या. शिवसेना व मित्रपक्षांसह महायुती होईल, असे गृहित धरून एक यादी; तर, शिवसेनेला वगळून दुसरी यादी तयार करण्यात आली आहे. त्यात चार छोट्या मित्रपक्षांना स्थान देण्यात आले आहे. महायुतीतील चारही मित्रपक्ष आपल्यासोबत राहतील, असे भाजपला वाटत आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको म्हणून भाजपची ताणाताणी
Date: