गोव्यात दरवर्षी रंगणा-या मानाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील इंडियन पॅनोरमा विभागात ‘कट्यार काळजात घुसली’ची निवड झाल्यानंतर या चित्रपटाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेलाय. इफ्फी २०१५ आणि इंटरनॅशनल कॉन्सिल फॉर फिल्म, टेलिव्हिजन अॅंड ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन (ICFT), पॅरिस आणि युनेस्को यांच्या मानाच्या फेलिनी पुरस्काराच्या स्पर्धेसाठी ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे भारतातील हे पहिले वर्ष असून इफ्फी २०१५ मधील एकूण ११ आंतरराष्ट्रीय चित्रपटांची यासाठी निवड करण्यात आलीये ज्यात ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटाचा समावेश आहे.
या निवडीबाबत दिग्दर्शक सुबोध भावे म्हणाले की, “अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्या स्पर्धेत कट्यारची निवड होणे ही निश्चितच आनंदाची बाब आहे. हा केवळ या चित्रपटाचा सन्मान नसून तो भारतीय शास्त्रीय संगीताचा, नाट्यसंगीताचा त्याचबरोबर पुरुषोत्तम दारव्हेकर, पंडित जितेंद्र अभिषेकी, डॉ. वसंतराव देशपांडे, प्रभाकर पणशीकर या दिग्गजांच्या कार्याचा सन्मान आहे. या निवडीचं श्रेय मी या चित्रपटासाठी दिवसरात्र मेहनत घेणा-या माझ्या सर्व कलावंत, तंत्रज्ञ आणि सहका-यांना देतो.”
कट्यारचे निर्माते आणि झी स्टुडिओज् मराठी विभागाचे बिझनेस हेड निखिल साने म्हणाले की, “आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अतिशय मानाच्या या पुरस्काराच्या स्पर्धेत कट्यार..ची निवड होणे ही मराठी आणि भारतीय चित्रपटांसाठी अभिमानाची बाब आहे. फेलिनीसारखा पुरस्कार ११९५ पासून ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये दिला जातो. आता युनेस्कोने पुढाकार घेत हा पुरस्कार भारतात आणला आहे आणि ज्याची सुरूवात इफ्फी २०१५ पासून होतेय. इफ्फी २०१५ मध्ये दाखल झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटांमधून ११ चित्रपटांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलीय. यामध्ये ‘कट्यार..’ हा मराठी चित्रपट आहे त्यामुळे हा चित्रपट आता आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठीचं आणि भारताचं प्रतिनिधीत्व करणार ही अभिमानाची गोष्ट आहे. या पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे परीक्षक सर्वोत्कृष्ट चित्रपटाची निवड करतील. यानिमित्ताने आंतरराष्ट्रीय समीक्षकांकडूनही कट्यार..ची दखल घेतली जाईल हे विशेष. या चित्रपटाच्याया निवडीचं श्रेय मी माझ्या आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमला देतो.”
यंदाच्या दिवाळीत प्रदर्शित झालेल्या ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी हाऊसफुल सुरूवात करत या चित्रपटाने ही दिवाळी सुरमयी बनवली आहे. विशेषतः तरूण वर्गातूनही या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळतोय. तिकीटबारीवर आणि समिक्षकांकडूनही अशा प्रकारचा उदंड प्रतिसाद मिळत असतानाच फेलिनी पुरस्कारासाठी झालेली निवड या आनंदात अधिक भर घालणारी आहे.

