पुणे, दि. 29 : विमाननगर येथील मे. इन्फोनेट बीपीओ सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीतील 1,37,568 युनिटची म्हणजे तब्बल 37 लाख 81 हजार 945 रुपयांची वीजचोरी महावितरणने उघडकीस आणली आहे. या प्रकरणी शनिवारी (दि. 28) दोघांसह कंपनीच्या संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
विविध कंपन्यांसाठी कॉलसेंटरची सेवा देणार्या बीपीओ सर्व्हिसेसमध्येही आता वीजमीटरमध्ये फेरफार करून होणार्या वीजचोरीचा प्रकार महावितरणने हाणून पाडला आहे व इन्फोनेट बीपीओ सर्व्हिेसेसमधील तब्बल 37 लाख 81 हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे.
याबाबत माहिती अशी, की नगररोड विभाग अंतर्गत विमाननगर येथील गंगा इम्पोरीया बिल्डिंगमध्ये मे. इन्फोनेट बीपीओ सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीच्या जागेसाठी महावितरणने वाणिज्यिक वीजजोडणी दिलेली आहे. या बीपीओ कंपनीमधील वीजवापराबाबत संशय निर्माण झाल्याने महावितरणच्या अभियंत्यांनी इन्फोनेट बीपीओमधील वीजमीटरच्या यंत्रणेची तपासणी केली. यात महावितरणकडून वीजमीटरला लावण्यात आलेले वेगवेगळे सील तुटलेले आढळून आले. प्राथमिक चाचणीत वीजमीटरची गती संथ झाल्याचेही दिसून आले. त्यामुळे हा वीजमीटर पंचनामा करून जप्त करण्यात आला. महावितरणच्या पुढील तपासणीत या वीजमीटरमध्ये फेरफार करून हेतूपुरस्सर मीटरची मूळ कार्यप्रणाली बंद केल्याचे व त्याद्वारे वीजचोरी केल्याचे दिसून आले. यात 1,37,568 युनिटची म्हणजे 37 लाख 81 हजार 945 रुपयांची वीजचोरी झाल्याचे निदर्शनात आले.
मे. इन्फोनेट बीपीओ सर्व्हिसेस लिमिटेडमधील वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे यांच्या नेतृत्वात अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, श्री. रमेश मलामे, कार्यकारी अभियंता श्री. गुलाबराव कडाळे, श्री. दत्तात्रय बनसोडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. गिरीश भगत व श्री. पंडित दांडगे, सहाय्यक अभियंता कैलास कांबळे, विजय जाधव, राहुल पालके, अमित कांबळे, वैशाली पगारे, तंत्रज्ञ सागर देसाई, सतीश उंडे, नंदकिशोर गायकवाड, निर्मल देशमुख आदींनी योगदान दिले.
या वीजचोरीप्रकरणी मे. इन्फोनेट बीपीओ सर्व्हिसेस लिमिटेडचे प्रशासकीय अधिकारी संग्राम तोमर, वीजजोडणीधारक जितेंद्ग कपिलदेव गुप्ता, इन्फोनेट बीपीओचे संचालक मंडळ यांच्याविरुद्ध शनिवारी (दि. 28) रास्तापेठ (पुणे) येथील महावितरण पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.


