आषाढी अमावस्येच्या सायंकाळी पुण्यात महिलांकडून व्यसनमुक्तीसाठी सामूहिक दीपपूजन
पुणे :
आषाढी अमावस्येनमित्त (गटारी अमावस्या) विविध सामिष सेलिब्रेशन आयोजित केले जात असताना, व्यसन मुक्तीचा संदेश देण्यासाठी दीप अमावस्येची सायंकाळ ही दीप पूजनाची, प्रकाशाच्या पूजेची आणि श्रावणाचे स्वागत करण्याची आहे, हे अधोरेखीत करण्यासाठी ‘प्रबोधन माध्यम’ या संस्थेच्या वतीने शुक्रवार,दिनांक 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता नवी पेठ विठ्ठल मंदिर, टिळक रोड, पुणे येथे दीप अमावस्या साजरी करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे. महिला व युवतींना एकत्र करून सामूहिक दीपपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संस्थेच्या संचालक गौरी बिडकर यांनी दिली. हा कार्यक्रम नवी पेठ विठ्ठल मंदीर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. यावेळी महिलांनी दीपपूजनासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आषाढ संपत आहे, श्रावण येत आहे, आषाढ समाप्ती अमावस्येने होते, तमाम जनता या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणते, खरे तर याच दिवशी दीप अमावस्या असते. ‘दिव्याची अमावस्या’ही दीप पूजनाची मानली जाते. घरातील सर्व दिवे छान घासून पुसून लख्ख करून त्याची पूजा करावी. प्रकाशाची कहाणी ऐकून संस्कृतीचा जागर करणार्या श्रावणाचे स्वागत करण्याचा दिवस आहे, असा संदेश या दीपपूजनाने मिळतो’, असे धार्मिक ग्रंथांमधेही नमूद केले आहे.
‘नको व्यसनाचा अंधार, हवा ज्ञानाचा प्रकाश’ ‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ या घोषणांचे फलक लावण्यात येणार आहेत. विविध आकार, रंगांचे, पारंपरिक दिवे, पणत्या-निरांजने, समया यांचे पूजन केले जाणार आहे. या निमित्ताने विविध दिवे पाहायला मिळणार आहेत. आपल्या मूळ संस्कृतीनुसार सण साजरे करून त्यातील सामाजिक संदेश पुढे आणण्याचा हा प्रयत्न आहे, असे गौरी बिडकर यांनी सांगितले.