चेन्नई –
चार दिवस उशिरा का होईना, शुक्रवारी मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल असून तो सात दिवसांच्या आतच संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.
पुढील ४८ तासांत मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकेल, असा अंदाज हवामान खात्यानं बुधवारी वर्तवला होता. त्यानुसार केरळमध्ये गुरुवारी रात्रीपासून पावसाच्या सरी कोसळत होत्या. कालपासूनच आकाशात ढग जमू लागले होते. त्यामुळे मान्सून दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर आज उकाड्याने हैराण झालेल्यांची प्रतीक्षा संपवत केरळमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात लक्षद्विप बेटाजवळ शनिवारी कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या ४८ तासांत केरळमध्ये पाऊस चांगलाच बरसला. राज्याच्या ७० टक्के क्षेत्रात सरासरी २.५ मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवसांत केरळ आणि कर्नाटकच्या भागांत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दक्षिण अरबी समुद्रात मान्सून वेगाने पुढे सरकत आहे. बंगाल उपसागराच्या दक्षिण भागातही मान्सून वेगाने पुढे सरकत आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मान्सून पुढे सरकण्यास अनुकूल परिस्थिती असून तो सात दिवसांच्या आतच संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
आला रे … आला मान्सून आला ……
Date:

