मुंबई -डान्सबारबंदी, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान आणि महात्मा गांधी तंटामुक्ती योजनेमुळे ग्रामीण व शहरी भागात लोकप्रिय असणारे संवेदनशील राजकारणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री रावसाहेब रामराव उर्फ आर. आर. पाटील यांचे कॅन्सरमुळे मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये सोमवारी निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.
दिवंगत पाटील यांच्या पार्थिवावर आज, मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास सांगली जिल्ह्यातील अंजनी या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या निधनाबद्दल राज्य सरकारने एक दिवसाचा दुखवटा जाहीर केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांसह अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. राजकीय पक्षांचे नेते, मंत्री व त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. रात्री उशिरा त्यांचे पार्थिव मुंबईहून सांगली जिल्ह्यातील मूळ गावी नेण्यात आले.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीआधी तोंडात वेदना होत असल्याचे जाणवू लागल्यामुळे त्यांनी मुंबईच्या बीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये काही वैद्यकीय तपासण्या केल्या. त्या वेळी त्यांना मुखातील कर्करोगासारखी चिन्हे दिसत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, निवडणुकीची धामधूम असल्याने त्यांनी निवडणुकीनंतर उपचार घेण्याचे निश्चित केले. निवडणूक निकालानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातील विधिमंडळातील विशेष अधिवेशनाला ते उपस्थित राहिले. त्या वेळी त्यांनी आमदारकीची शपथ घेतानाच फडणवीस सरकारचा विश्वासदर्शक ठराव असो किंवा विधानसभा अध्यक्ष व विरोधी पक्षनेता यांच्या निवडीच्या वेळी केलेली भाषणे ही अखेरची ठरली.
विशेष अधिवेशनानंतर उपचारासाठी आबा बीच कॅंडी रुग्णालयात दाखल झाले. बीच कॅंडीतील शस्त्रक्रिया झाल्यानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांच्यावर तेथे उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याचे रुग्णालय प्रशासनाने जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी लीलावतीकडे दुपारी धाव घेतली. या वेळी आर. आर. यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सकाळी दहापासून त्यांची तब्येत अधिक ढासळू लागली आणि शरीरातील एकएक अवयव निकामी होऊ लागल्याने त्यांनी उपचाराला साथ देणे बंद केले. या कालावधीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्रीवर भेट घेऊन घटनेची कल्पना दिली. मुख्यमंत्र्यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द करत लीलावतीकडे धाव घेतली.
आर आर पाटील यांचे दुखः द निधन -महाराष्ट्र हळहळला
Date:

