पुणे:
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी “महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस'(“डायल 108′) सेवेच्या पुण्यातील औंध येथील रिस्पॉन्स सेंटरला आज दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सकाळी भेट दिली आणि सेवेचा आढावा घेतला. बी. व्ही. जी. संचालित आपत्कालीन वैद्यकीय सेवा (डायल 108) चे हे केंद्र “औंध उरो रुग्णालय’ येथे आहे. यावेळी गृहराज्यमंत्री राम शिंदे, आमदार लक्ष्मण जगताप, सुजाता सौमिक (सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग), श्रीमती आय.ए.कुंदन (“नॅशनल हेल्थ रूरल मिशन’च्या व्यवस्थापकिय संचालक) आदी मान्यवर उपस्थित होते.
“बीव्हीजी इंडिया लि.’चे अध्यक्ष एच.आर. गायकवाड, “महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके, धैर्यशील काळे (बीव्हीजी इंडिया लि., मनुष्यबळ विभाग प्रमुख) यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
“शहरामध्ये रूग्णवाहिकांना पर्याय मिळू शकतो, मात्र ग्रामीण भागात या “डायल 108′ रूग्णवाहिका सेवेची अधिक आवश्यकता आहे’, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी यावेळी सांगितले.
“डायल 108′ रूग्णवाहिका सेवेद्वारे ग्रामीण भागात साप – विंचु चावणे, हृदयविकार अशा प्रसंगात आपत्कालीन सेवा देण्यात येतात. तसेच अपघात, भोवळ येणे, अर्धांगवायू, विषबाधा, आगीत भाजणे अशा अनेक प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये ही रुग्णवाहिका बोलावता येते. संपूर्ण महाराष्ट्रभर आपत्कालीन सेवा देणारी “एम.ईएम.एस-बी.व्ही.जी डायल 108′ ही एकमेव आप्तकालीन सेवा आहे. सेवेला येत्या 26 जानेवारी रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे. एक वर्षात या आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा सुमारे दोन लाख बारा हजार, तीनशे चौसष्ट रुग्णांनी लाभ घेतला आहे, अशी माहिती “महाराष्ट्र मेडिकल इमर्जन्सी सर्व्हिसेस’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी दिली.
राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत, गृहराज्यमंत्री राम शिंदे, आमदार लक्ष्मण जगताप यांनी अत्याधुनिक रुग्णवाहिकेची पाहणी करून ही आपत्कालीन वेद्यकिय सेवा कशाप्रकारे चालविली जाते त्याबाबत अधिक माहिती घेतली व समाधान व्यक्त केले.