पुणे:- प्रेमाची परिभाषा वेगळ्याप्रकारे रेखाटणारा ‘आय.पी.एल.’ हा नवा मराठी चित्रपट येत्या २६ डिसेंबरपासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे. एम.आर.पी.फिल्म्स प्रस्तुत ‘आय.पी.एल.’ या चित्रपटाची निर्मिती मोहन पुरोहित आणि मुस्ताक अली यांनी केले असून दिग्दर्शन दीपक कदम यांनी केले आहे. ” चित्रपटाचे नाव ‘आय.पी.एल.’ असले तरी त्याचा क्रिकेटशी अजिबात संबंध नाही. चित्रपटाचे खरे नाव ‘इंडियन प्रेमाचा लफडा’ असे असून या चित्रपटात प्रेमाची आगळीवेगळी मैच पाहायला मिळणार आहे असे सांगताना दिग्दर्शक दीपक कदम म्हणाले की, आपल्या भारतीय संस्कृतीत असलेले उदात्त भावनात्मक प्रेम आजच्या काळात हरवत चालले आहे त्याचाच उहापोह एका वेगळ्या प्रेमकथेद्वारे या चित्रपटात करण्यात आला आहे. या चित्रपटाची तांत्रिक मुल्ये उच्च दर्जाची आहेत असेही ते म्हणाले. याप्रसंगी चित्रपटातील प्रमुख कलावंत विजय पाटकर, नायक (ज्यु.) स्वप्नील जोशी, नायिका शीतल उपरे तसेच सहनिर्माते मुस्ताक अली हे उपस्थित होते.
(ज्यु.) स्वप्नील जोशी याचा नायक म्हणून तसेच शीतल उपरे हिचा नायिका म्हणून पहिलाच चित्रपट असून या चित्रपटातील आमच्या भूमिकेला आम्ही जास्तीत जास्त न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे असे उभयतांनी यावेळी सांगितले. शीतल उपरे हिने नेपाळ येथे नुकत्याच झालेल्या ‘मिस हेरीटेज सुंदरी स्पर्धेत भाग घेऊन द्वितीय क्रमाक पटकाविला आहे. श्री विजय पाटकर यांनीही चित्रपटातील भूमिकेचे अनुभव कथन केले. तर मुस्ताक अली यांनी चित्रपट चांगला होण्यासाठी उच्च तांत्रिक मूल्यात कोठेही तडजोड केली नाही. असे जेष्ठ अभिनेते व दिग्दर्शक व सध्याचे मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी सांगितले.
‘आय.पी.एल.’ या चित्रपटाची कथा पटकथा दीपक कदम यांचीच असून संवाद प्रकाश भागवत यांचे आहेत. प्रसिद्धीप्रमुख रामकुमार शेडगे असून प्रशांत मिसळे यांनी छायादिग्दर्शन केले असून कलादिग्दर्शक आहेत ऋग्वेद रानडे. अभिजित कुलकर्णी यांच्या गीतांना आशिष डोनाल्ड आणि देव यांनी संगीतबद्ध केले असून चित्रपटातील पाच गाणी आदर्श शिंदे, बेला शेंडे, स्वप्नील बांदोडकर, श्रुती राणे, विक्रांत राणे आणि मित यांनी गायली आहेत. ‘आय.पी.एल.’ येत्या २६ डिसेंबरपासून महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.