पुणे- आरोग्याच्या तक्रारीमुळे अनेक लोक व विशेषत: महिला पीडित आहेत. ‘आयुष’च्या
आरोग्याबाबत अनेक योजना आहे. ‘शारदा शक्ती’ सारख्या उर्जा असलेल्या संघटनांच्या
माध्यमातून ‘आयुष’च्या योजना गावागावात नेऊन जनजागृती झाली तर समर्थ भारताचे स्वप्न
पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी रविवारी
केले.
‘शारदा शक्ति’ महिलांचे राष्ट्रीय संघटन ही ‘शक्ति’ या राष्ट्रीय संघटनेची पश्चिम महाराष्ट्रातील शाखा
आहे. त्यांच्या वतीने टिळक आयुर्वेद महाविद्यालय व महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे इन्स्टिटयूट ऑफ
हेल्थ सायन्सेस या संस्थांच्या सहकार्याने ‘स्वस्थ नारी – समर्थ भारत’ हे उद्दिष्ट डोळयासमोर ठेवून
आयोजित करण्यात आलेल्या ‘महिला आरोग्यः आव्हाने आणि उपाययोजना’ या विषयावरील दोन दिवसीय
राष्ट्रीय परिषदेचा समारोप श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते. स्वागत
समिती अध्यक्ष डॉ. जयश्री फिरोदिया, या परिषदेचे स्थानिक पालक डॉ. विजय भटकर, डॉ.के. आर. संचेती,
शारदा शक्तीच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुधाजी तिवारी, संयोजन समितीच्या अध्यक्षा डॉ. माया तुळपुळे,
सचिव डॉ. लीना बावडेकर, डॉ. अंकिता बोहरे, श्रीमती बिंदू सुराज हे यावेळी उपस्थित होते. पुणेरी पगडी,
शाल, स्मृतीचिन्ह देवून संयोजकांनी नाईक यांचा सत्कार केला.
नाईक म्हणाले, आर्थिक, सामाजिक, राजकीय, आध्यत्मिक स्वास्थ्य जसे महत्वाचे आहे तसेच महिलांचे
शारीरिक स्वास्थ्य हेही महत्वाचे आहे. पूर्वी महिला घरातील धुणे धुणे, विहिरीतून पाणी काढणे, मसाला
तयार करणे अशी अंग मेह्नितीची कामे करत. त्या कामांमधून शरीरातील घाम बाहेर टाकला जात असे.
मात्र, आधुनिक युगात शारीरिक श्रमाची कामे महिला करत नाहीत. त्यामुळे शरीरातील घाम बाहेर पडत
नाही. पूर्वी पुरुषांमध्ये आढळणारे रक्तदाब, मधुमेह, असे आजार आता महिलांमध्येही आढळू लागले
आहेत. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी नियमित
व्यायाम, योगा करणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील महिला अजूनही कुपोषित आहेत. या महिला
‘अॅनिमिया’ने पीडित असतात. पोषणासंबंधी ग्रामीण भागात अजूनही स्रियांच्या बाबतीत भेदभाव केला
जातो. यामध्ये बदल होण्याची आवश्यकता आहे. एकीकडे कलाक्षेत्र, राजकारण अशी पुरुषांचे वर्चस्व
असलेले क्षेत्र स्रीयांनी पादाक्रांत केली आहेत. वैमानिक होण्यापर्यंत तिची मजल गेली आहे. तर दुसऱ्या
बाजूला तिचे शोषण अजूनही होते आहे. केंद्र सरकारच्या ‘आयुष’ विभागाच्या महिलांसाठी अनेक योजना
आहेत. त्या गावागावातील महिलांपर्यंत शारदा शक्ती सारख्या महिला संघटनांनी पोहचविल्या तर समर्थ
भारताचे स्वप्न नक्की साकार होईल.
या दोन दिवसांच्या परिषदेतून अनेक निष्कर्ष निघाले असतील त्यावर विचार करून ‘आयुष्’च्या
माध्यमातून उपाय केले जाऊ शकतात असे सांगून नाईक म्हणाले, आयुषच्या उपचार पद्धतीमुळे
लठ्ठपणा, दमा, यांसारखे रोग पुन्हा होण्याची शक्यता कमी असते.
डॉ. संचेती म्हणाले, महिलांचे आरोग्य हा केंद्रबिंदू ठेऊन भरविण्यात आलेल्या अशा प्रकारच्या परिषदेची
अत्यंत आवश्यकता आहे. आपण गुढघ्याची शस्त्रक्रिया करत असलो तरी आयुर्वेदिक उपचार रुग्णांना देतो.
अॅलोपथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी यांच्या एकत्रित उपचाराचा चांगला उपयोग होतो असे त्यांनी
सांगितले.
डॉ. सुधा तिवारी म्हणाल्या, महिला या संस्कृती व संस्काराचे प्रतिक आहे तरी अजूनही भ्रूणहत्या,
कौटुंबिक हिंसाचार याला महिलांना सामोरे जावे लागते. ४२ टक्के महिलांची प्रसुती अजूनही दवाखान्यात
होत नाही. परंतु यासाठी सरकारने केवळ कायदे करून काही होणार नाही. त्यासाठी शारदा शक्ती सारख्या
संघटनांनी काम करण्याची आवश्यकता आहे. महिलांचा सर्वांगीण विकास त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी व
त्यांना सक्षम करण्यासाठी शारदा शक्तीतर्फे अनेक कार्यक्रम राबविले जातात असे त्यांनी सांगितले.
डॉ. लीना बावडेकर यांनी या परिषदेमागचा हेतू स्पष्ट केला, डॉ. माया तुळपुळे यांनी परिषदेच्या
वाटचालीची माहिती दिली तर डॉ. अरुणा चाफेकर यांनी दोन दिवसांच्या परिषदेचा आढावा घेतला.
या परिषदेत वैद्यकीय शाखेतील १३५ प्राध्यापक व विद्यार्थी यांनी शोधनिबंध सादर केले. तसेच काही
संशोधकांनी आपले विषय पोस्टर्सच्या माध्यमातून प्रदर्शित केले होते. यातील उत्कृष्ट पाच शोधनिबंध व
चार पोस्टर्सना पारितोषिके यावेळी देण्यात आली.
डॉ. माधुरी पवार, ऐश्वर्या अग्रवाल, डॉ. अनुराधा कुलकर्णी, डॉ. शोभित दवे, व लिली बेरा यांनी उत्कृष्ट
शोधनिबंधासाठी तर डॉ. प्रतिभा फाटक, डॉ. पल्लवी गोरडे, डॉ. सरिता भुतडाव सेफिना वर्गीस यांना
उत्कृष्ट पोस्टर्ससाठी पारितोषिके देण्यात आली.
सुत्रसंचालन डॉ. रुपाली पानसे यांनी केले तर डॉ. राजश्री कशाळकर यांनी आभार मानले.


