मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्त्याग्रस्त 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा कायद्यान्वये स्वस्त दरात धान्य आणि राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ दिला जात आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत या दोन्ही योजना यशस्वीरित्या पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
राज्यातील पावसाची स्थिती, पीक परिस्थिती, पाणी साठा आदीबाबत समग्र आढावा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्य शासनाने खास बाब म्हणून शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी स्वस्त दराने गहू, तांदुळ पुरविणे तसेच राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ मिळावा यासाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. ज्या जिल्ह्यात राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत सहभागी रुग्णालयांची संख्या कमी असेल ती वाढविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने प्रस्ताव सादर करावेत. त्याचबरोबर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना देऊन धान्य साठा पुरेसा राहील याची दक्षता घेण्यात यावी.
सध्या बऱ्याच ठिकाणी सरासरीच्या तुलनेत पाऊस कमी होत आहे, अशा ठिकाणी पिण्याच्या पाण्या बरोबरच जनावरांना लागणाऱ्या चाऱ्याची टंचाई भेडसावू नये म्हणून वैरण विकास कार्यक्रम तातडीने हाती घेण्यात यावा. कृषि आणि महसूल विभागाच्या समन्वयातून हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबवावा. जिल्हा प्रशासनाने पिण्याचे पाणी, चारा टंचाई, धडक विहिरी, जलयुक्त शिवार अभियानावर लक्ष केंद्रीत करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ज्या जिल्ह्यांची जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कामे पूर्ण झाली आहेत. परंतु त्यांनी काम पूर्ण झाल्याबाबतचे छायाचित्र संकेतस्थळावर अपलोड केले नाही त्यांनी ते तातडीने करण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी यावेळी दिल्या.
मराठवाड्यात सरासरीच्या 40 टक्के पाऊस झाला असून कालपासून पावसाला सुरूवात झाल्याची माहिती औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी दिली. अमरावती विभागात सरासरीच्या 94 टक्के पाऊस झाला असून 4779 धडक विहिरींचे काम पूर्ण झाल्याची माहिती अमरावती विभागीय आयुक्तांनी दिली. नाशिक विभागात 77 टक्के पाऊन झाल्याची माहिती नाशिक विभागीय आयुक्तांनी दिली.