पुणे- पुणे रेल्वेस्थानक लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वे स्थानक होणार आहे आणि आंतरराष्ट्री दर्जाच्या सुविधांबरोबरच ग्राहकांशी होणारा हमालांचा संवादही आता इंग्रजीमध्ये होणार आहे. हो हे शक्य आहे ! सुर्यदत्ता इन्स्टिट्यूटच्या वतीने पुणे रेल्वेस्थानकावरील हमालांसाठी प्राथमिक इंग्रजी शिक्षणाच्या अनोख्या उपक्रमाला सुरुवात झाली आहे.
सुर्यदत्ता इन्स्टिट्यूटचे अद्यक्ष डॉ. संजय चोरडिया व सुषमा चोरडिया यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाला आज विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात सुरुवात झाली. याप्रसंगी पुणे रेल्वे स्थानकाचे उपव्यवस्थापक बी. व्ही. पाटील, सुमीत काथने, नगरसेवक रवींद्र माळवदकर, प्रा. ए. सी. सेठीया, प्रा. शिला ओक आदि उपस्थित होते.
समाजातील आर्थिक विषमता दूर करणसाठी ‘शिक्षण सर्वांकरिता‘ ही संकल्पना घेऊन सुर्यदत्ता इन्स्टिट्यूट गेली १० ते १२ वर्षे काम करित आहे, यापूर्वी रिक्षा चालक, कागद गोळा करणा-या कर्मचा-यांना संस्थेच वतीने प्राथमिक शिक्षण व इंग्रजीचे ज्ञान देण्याचा उपक्रम राबविला आहे. आता हमालांना इंग्रजीचे ज्ञान दिले जाणार आहे.
शिला ओक यांनी पुणे रेल्वेस्थानकावर हमालांचा इंग्रजीचा तास घेतला. “गुड मॉर्निंग, माय नेम इज…”, “माय बॅच नंबर इज…”, “वेलकम टू पुणे”, “मे आय हेल्प यू?” आदि वाक्ये त्यांनी हमालांना शिकवली आणि विशेष म्हणजे हमालांनाही या बिनभिंतीच्या शाळेत शिकताना खूप मज्जा येत होती. याप्रसंगी सर्व हमालांनी इंग्रजी शिकण्याची व बोलण्याची शपथ घेतली.