मुंबई -सनी लिओन ला भारतातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न हिंदू जनजागृती समितीने एकीकडे सुरु केला आहे तर दुसरीकडे तिला वाळीत टाकण्यासाठीही हालचाली सुरु झाल्या आहेत . याच पार्श्वभूमीवर
सनी लिओनसारख्या पॉर्नस्टारना भारतीय चित्रपटात संधी देणेच चुकीचे असल्याचे परखड मत प्रख्यात अभिनेते विक्रम गोखले यांनी औरंगाबादेत व्यक्त केले.
तिच्याबद्दल महिला म्हणून मला आदर आहे. मात्र, ती अभिनय करणारी कलाकार नाही. तिला चित्रपटात घेऊन अधिकाधिक अंगप्रदर्शन करायला लावत चित्रपट बनवणारे आणि त्याचा व्यवसाय करत गल्ला जमवणारे खरे गुन्हेगार आहेत, असे गोखले म्हणाले
. ‘सिद्धांत’या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गोखले शनिवारी औरंगाबादेत आले होते. त्यावेळी त्यांना सनी लिओनसारखे पॉर्न स्टार हिंदी चित्रपटात काम करतात, याबद्दल तुम्हाला काय वाटते. अंगप्रदर्शन करण्याप्रकरणी सनीविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे योग्य आहे का, असे विचारले असता ते म्हणाले की, सनी चित्रपटात काम करून तिचा व्यवसाय प्रामाणिकपणे करत आहे. ती काही उद्दिष्टे ठरवून भारतात आली. मात्र, तिची उद्दिष्टे आणि भारतीय किंवा चित्रपटांची पार्श्वभूमी भिन्न आहे. परंतु, हे मान्य नसलेल्या मंडळींनी तिला स्वत:च्या फायद्यासाठी वापरले आहे.
पण तिला हिंदी चित्रपटांमध्ये घेऊन कलाकृतीला विकृत करणे चुकीचे आहे. जी मंडळी तिच्यासारख्या महिलांचा वापर करत गल्ला जमवत आहेत. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. अशा दिग्दर्शक, निर्मात्यांनी हिंदी चित्रपटाऐवजी पॉर्नफिल्म बनवाव्यात. मुळात प्रेक्षकांना भावेल किंवा त्यांच्या पसंतीस उतरेल ते बनवून जे काही केले जाते तो व्यवसाय आहे अन् आपल्याला वाटेल ते प्रेक्षकांना दाखवणे हा पेशा आहे. चित्रपटातून सामाजिक, वैचारिक मूल्य समाजापर्यंत पोहोचली पाहिजेत. नैतिक मूल्ये जपत मनोरंजन करणे हेच चित्रपटांचे उद्दिष्ट असावे, असे गोखले म्हणाले.
“सनीचे चित्रपट गल्ला जमा करतील. तिच्यासारख्या महिलांचा वापर करून भडक, अंगप्रदर्शनावरच आधारित चित्रपट निर्मितीच केली पाहिजे, असा समज होऊन त्याची पुनरावृत्ती होत राहील. हे धोक्याचे आहे.”