पुणे- ‘मी कोण आहे? याचा शोध घेणे हे जीवनाचे अंतिम सत्य आहे, जीवनात ताणतणाव घेऊ नका, भविष्याचा विचार करू नका, जगत असलेला प्रत्येक क्षण उत्तम करण्याचा प्रयत्न करा, जीवनाचा हेतू हसणे आणि निरपेक्ष प्रेम करणे असा आहे’ असे मत सुप्रसिध्द लेखिका अनिता मुरजानी यांनी व्यक्त केले.
अनिता मुरजानी यांनी लिहिलेल्या ‘डायिंग टू बी मी’ या ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या विक‘मी खपाच्या पुस्तकाचा मराठी अनुवार ‘आणि…त्या दिवशी माझा मृत्यू झाला’ ‘वॉव पब्लिकेशन’च्या वतीने प्रकाशित करण्यात आला. त्यावेळी श्रीमती मुरजानी अनुभव कथन करीत होत्या. ज्येष्ठ लेखक प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी होते. बुक गंगा इंटरनॅशनल बुक सर्व्हिसेस, डेक्कन जिमखाना येथे प्रकाशन समारंभ झाला.
श्रीमती मुरजानी पुढे म्हणाल्या, ‘चार वर्षे कॅन्सरच्या आजारानंतर मी कोमात गेले. त्या अवस्थेत मी छत्तीस तास होते. मला बाह्य जगाची जाणीव होत होती. या अवस्थेत माझ्या वेदनाही खूप कमी झाल्या. माझे वडील आणि कॅन्सरने मृत झालेल्या मैत्रिणीशी संवाद झाला. मी प्रत्यक्ष मृत्यूला स्पर्श करून आले. स्वर्गात जायचे की भौतिक जगात परतायचे हे पर्याय माझ्यासमोर खुले होते. मी पुन्हा भौतिक जगात जाऊन माझ्या शरीरात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर माझा कॅन्सर पाच आठवड्यात पूर्णपणे बरा झाला. आता मी नेहमीचे जीवन जगत आहे. स्वर्ग ही जागा नसून ती एक अवस्था असल्याचे माझे मत झाले आहे. मनुष्यामध्ये अद्भूत शक्ती असल्याची जाणीव ही या अवस्थेत मला झाली.’
प्रा. जोशी म्हणाले, ‘लौकिक जगापलीकडील अलौकिक अनुभव मुरजानी यांनी शब्दबध्द केले आहेत. त्यांनी ‘मी’च्या पलिकडे जाऊन ‘स्व’चा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. भौतिक जीवनातील प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी बाह्य जगाऐवजी अंतर्मनात डोकावण्याची गरज असते, तसेच जीवन उन्नत करण्यासाठी तंत्रज्ञानाबरोबरच तत्वज्ञानाची आवश्यकता आहे.’
‘मृत्यूनंतरचे जीवन’ हा सर्वांसाठीच कुतूहलाचा विषय असतो. अनिता मुरजानी यांचा कॅन्सरपासून मृत्यूपर्यंत आणि मृत्यूपासून पुन्हा सुरू झालेल्या नवजीवनापर्यंतचा रोमांचकारी प्रवास या पुस्तकात शब्दबध्द करण्यात आला आहे. त्यांचा हा रोमांचकारी अनुभव अनेक वाचकांच्या जीवनाला दिशा देणारा आणि विचारांच्या कक्षा रुंदावणारा आहे. ‘बुक गंगा’च्या संचालिका सुप्रिया लिमये यांनी स्वागत, चेतन कोळी यांनी सूत्रसंचालन आणि कृष्णा अय्यर यांनी आभार मानले.