पुणे : आकुर्डी परिसरात 13 घरगुती ग्राहकांकडे सुरु असलेली 91,103 युनिटस्ची म्हणजे 11 लाख 62 हजार 910 रुपयांची वीजचोरी उघडकीस आली आहे. महावितरणच्या वतीने गेल्या दोन दिवसांतील विशेष मोहिमेत ही वीजचोरी उघड झाली.
याबाबत माहिती अशी, की भोसरी विभाग अंतर्गत आकुर्डी उपविभागातील मोरेवस्ती, विवेकनगर, पांढरकरवस्ती, मोशी आदी परिसरात महावितरणचे अभियंते व जनमित्रांच्या पथकांनी वीजमीटरची विशेष तपासणी मोहीम सुरु केली. यात एका घरगुती ग्राहकाने महावितरणची अधिकृत वीजजोडणी घेतलेली नव्हती. या ग्राहकाकडे बाहेरून आणलेले मीटर लावून त्यावर दुसर्या अधिकृत वीजग्राहकाचा क्रमांक लिहून सर्रास वीजचोरी सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला. सहा खोल्यांसाठी हा वीजवापर सुरु होता. एकाच ग्राहक क्रमांकाचे दोन मीटर दिसून आल्याने महावितरणच्या कर्मचार्यांना संशय आला व तपासणीनंतर यात 42,228 युनिटस्ची म्हणजे 7 लाख 10 हजार 910 रुपयांची वीजचोरी उघडकीस आली.
यासोबतच 12 घरगुती ग्राहकांकडे वीजचोरी आढळून आलेल्या आहेत. यात मीटर बायपास करून वीजवापर करणे, मीटरमध्ये फेरफार करून त्याची गती संथ करणे आदी प्रकार आढळून आले. या 12 ठिकाणी 49,875 युनिटस्ची म्हणजे 4 लाख 52 हजार रुपयांची वीजचोरी उघड झाली. या 13 वीजचोरीप्रकरणी संबंधीतांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003 नुसार कलम 135 अन्वये कारवाई करण्यात येत आहे.


