ज्योती कुलकर्णी रिसर्च फाउंडेशनतर्फे महिलांसाठी स्पर्धा व प्रदर्शन
पुणे 20 ऑक्टो : फुले, पाने, छोट्या डहाळ्या, फळे आदींच्या साहाय्याने केलेली आकर्षक मांडणी. ग्लॅडिओली, गुलाब , आर्किड, जरबेरा, कार्नेश, ऍन्थुरियम, लास्पर, शेवंती आदी फुलांचा तसेच अरेका पाम, अम्ब्रेला पाम, शोभेची अळूची पाने, लीलीची पाने, ऍस्परॅगस, सायकस, केवडा यांसारख्या पानांचा नेमका वापर. फुले व पानांची त्यांच्या रंग व आकारमानानुसार अचूक सांगड घालून केलेली आकर्षक व मनमोहन कलाकृती पाहण्यास पुणेकरांनी एकच गर्दी केली होती.
निमित्त होते ज्योती कुलकर्णी रिसर्च फाउंडेशनतर्फे घेण्यात आलेल्या पुप्षरचना स्पर्धेचे. महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव ही स्पर्धा घेण्यात आली. पुष्परचनेच्या या स्पर्धेमध्ये ३२ महिलांनी सहभाग घेऊन पुष्परचना सादर केल्या. यावेळी इकेनोबो इकेबाना सोसायटीच्या अध्यक्षा शैलजा दिवेकर व त्यांच्या शिष्या अरुंधती देशपांडे यांनी या स्पर्धेचे परिक्षक केले. स्पर्धेतील पुष्परचना पाहण्याची सर्वांना संधी मिळावी, यासाठी स्पर्धेंनंतर लगेचच प्रदर्शनही भरविण्यात आले. डीएसके स्कूलच्या उपमुख्याध्यापिका उमा पानसे, यावेळी ज्योती कुलकर्णी फाउंडेशनच्या विश्वस्त अश्विनी देशपांडे, हेमंती कुलकर्णी, भाग्यश्री कुलकर्णी, तन्वी कुलकर्णी यादेखील उपस्थित होत्या.
यावेळी दिवेकर यांनी महिलांना मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, पुष्परचना ही कला दिसायला सोपी वाटते परंतु, यात अनेक बारकावे असतात. ज्यांना हा छंद उपजत आहे त्यांनी जरूर यास वेळ द्यावा. छंद म्हणून ही कला जोपासण्याबरोबरच सध्या व्यावसायिक महत्वही यास प्राप्त झाले आहे. आकर्षक कलाकुसर व पुष्पमांडणी करणार्यांची येत्या काळात मागणी असणार आहे. हे लक्षात घेऊन, पुष्परचनेत रस असणार्यांसाठी आम्ही कार्यशाळा घेत असतो. महिलांचाही यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. ज्या महिलांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे परंतु, त्यांना या कलेविषयी तळमळ आहे अशांसाठी आम्ही कमी खर्चात किंवा त्यांच्या सोयीनुसारही प्रशिक्षण देतो. महिलांचा उत्साह पाहून आम्हालाही नवीन उर्मी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
दैनंदिन जीवनातून स्वत: साठी वेळ काढून जोपासलेल्या छंदाना एक व्यासपीठ मिळावे, या हेतूने खास महिलांसाठी फाउंडेशनने हा आगळावेगळा उपक्रम राबविला होता. स्पर्धा आणि प्रदर्शनाबरोबरच येत्या काळात पुष्परचनेविषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा सुरु करणार असल्याचा मानस आश्विनी देशपांडे यांनी यावेळी व्यक्त केला. या निर्णयाचे स्वागत करत या कार्यशाळेदरम्यान महिलांना मोफत मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिवेकर यांनी दिले.