पुणे
मराठी सिनेमात नवनवीन विषयावर प्रयत्न केले जातात. त्या प्रयत्नांना रसिक प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद देखील मिळत आहे. मराठीची ही वाटचाल आणखी यशस्वीरित्या होत आहे. मराठी सिनेसृष्टीने अनेक नामवंत कलाकर दिले आहेत. त्यांचीच पुढची पिढी आपली सिनेसृष्टी घडवत आहे. अशीच एक नव्या दमाची फळी ‘ब्लॅंकेट’ सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लाईट्स, कॅमेरा, अक्शन म्हणत ‘ब्लॅंकेट’ सिनेमाच्या मुहूर्ताचा clap नितीन मनमोहन यांनी नुकताच पुण्यात दिला. आई मुलीच्या नात्यावर प्रकाश टाकणारा हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांच्या मनात घर करेल. सिनेमातील आपलं वेगळेपण जपणारा असा हा सिनेमा असणार आहे. या सिनेमाची कथा अतिशय साधी आहे. एक सहा वर्षांची लहान मुलगी, ती आणि तिची आई सोबत असणारे दारिद्र्य आणि कचऱ्याचे डोंगरा ऐवढे ढीग. या सगळ्यातही फुलणारं त्या दोघींमधील भावविश्व या सिनेमात पहायला मिळणार आहे. राज गोरडे आणि आशुतोष गोविंदराव यांनी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. होरीझोन मोशन पिक्चर्स या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती होणार असून डॉ सुरेश तेलंग आणि आशुतोष गोविंदराव हे सिनेमाचे निर्माते आहेत तर मुकुंद लोखंडे सहनिर्माते आहेत. नंदिता धुरी, सिद्धी तेलंग, अथर्व बागेवाडी, आशुतोष गोविंदराव, राज गोरडे, रेवती लिमये, ऐश्वर्या जाधव, अनिकेत बर्वे असे काही नवीन चेहरे सिनेमात पाहायला मिळणार आहेत. सिनेमाची मुळ संकल्पना राज गोरडे यांची असून अनिकेत गायकवाड, राज गोरडे तसेच आशुतोष गोविंदराव यांनी मिळून कथा लिहिली आहे. या सिनेमाचं शुटींग येत्या १२ मे पासून सुरु होणार आहे.