‘अवजड वाहन क्षेत्रातील क्रांतीसाठी सज्ज व्हा!’ ‘सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह एंजिनिअर्स’च्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षांचे आवाहन
पुण्यातील आंतरराष्ट्रीय ‘लीडरशीप एन्क्लेव्ह’ला चांगला प्रतिसाद
पुणे :
‘कृषी, बांधकाम, रस्ते निर्मितीसाठी लागणार्या अवजड वाहननिर्मितीच्या क्षेत्रात 2050 पर्यंत आमूलाग्र क्रांती होत असून, अभियांत्रिकी क्षेत्रातील सर्वांनी त्यासाठी सज्ज झाले पाहिजे’, असे आवाहन ‘सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स’चे आंतरराष्ट्रीय क्युनेट ओज यांनी केले.
‘सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स’,‘ए.आर.ए.आय.’(ऑटोमो टीव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया), ‘अॅन्सिस, ‘ईटॉन’, ‘कमिन्स’, ‘जेसीबी’, ‘जॉन डिअर’, ‘महिंद्रा’, ‘पीटीसी’ यांच्या संयुक्त विद्यमाने हयात इस्टा, कल्याणीनगर, पुणे येथे आंतरराष्ट्रीय ‘लीडरशीप एन्क्लेव्ह’चे मंगळवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. ‘एसएई’चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष क्युनेट ओज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेत अभियांत्रिकी विद्यार्थी, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी, संशोधक, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी सहभागी झाले होते.
तंत्रज्ञान, धोरणात्मकबदल, मनुष्यबळ प्रशिक्षण या विषयी या परिषदेत चर्चा झाली.
क्युनेट ओज म्हणाले, ‘सध्या अवजड वाहनांच्या निर्मितीला चांगला काळ आहे. या क्षेत्रात तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल होत असून, 2050 पर्यंत क्रांती होणार आहे. या क्रांतीसाठी सर्वांनी सज्ज झाले पाहिजे.’
‘एखाद्या ‘सायन्स फिक्शन’ प्रमाणे हे बदल होत आहेत. ‘पॉवर टेरेन’ वाहनांप्रमाणे ‘अॅपल’, ‘गुगल’च्या कारपर्यंत अनेक उत्पादने निर्माण होत आहेत. दुसरीकडे हवामान बदल, कार्बन उत्सर्जन, वाहतूक, मेगासिटी, यावर संशोधन करावे लागत आहे. अशा पार्श्वभूमीवर 2050 हा महत्त्वाचा, क्रांतीकारक टप्पा ठरणार असून, त्यात अभियांत्रिकीतील तरुण महत्त्वपूर्ण योगदान देतील.’
‘भारतात ‘एसएई’च्या सहयोगाने अभियांत्रिकीत महिलांचे प्रमाण वाढत असून, ती स्वागतार्ह बाब आहे’, असेही ते म्हणाले.
क्रिस मायर्स (डीअर अॅण्ड कंपनी), टॉम स्टोव्हर (ईटॉन कार्पोरेशन), मुरली अय्यर (एसएई ग्लोबल अॅडव्हायझर), अमित आगरवाल (अॅन्सीस), देवेंद्र बहिरट (जॉन डिअर), पॉल सॉवरबी (कमिन्स), डॉ. के. सी. व्होरा (एआरएआयचे उपसंचालक) हे मान्यवर देखील या परिषदेत सहभागी झाले.
अवजड वाहन अभियांत्रिकीतील एसएईच्या प्रशिक्षणाबद्दल अश्विनी वढावकर या विद्यार्थिनींने अनुभव मांडले.