औरंगाबाद : अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे सगळ्यात प्रभावी माध्यम असून समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी अल्पसंख्याक समाजातील मुलींना शिक्षणाची संधी मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी केले.
अल्पसंख्याक विकास विभागाच्यावतीने येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात मुलींचे वसतिगृह उभारण्यात आले आहे. सुमारे 5 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या 175 प्रवेश क्षमतेच्या या वसतिगृहाच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल बोलत होते. अध्यक्षस्थानी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे होते. यावेळी महसूल व अल्पसंख्याक विकास मंत्री एकनाथराव खडसे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, अल्पसंख्याक विभागाच्या प्रधान सचिव जयश्री मुखर्जी, विभागीय आयुक्त डॉ.उमाकांत दांगट, कुलगुरु प्रा. बी.ए. चोपडे आदी उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले, व्यक्तिच्या जडणघडणीत आणि सुसंस्कृत समाजाच्या उभारणीमध्ये शिक्षणाची भूमिका परिणामकारक असून ग्रामीण भागातील तसेच दुर्बल घटकांतील मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध होणे गरजेचे आहे. अल्पसंख्याक समाजाच्या प्रगतीमध्ये या समाजातील मुलींची प्रगती हा महत्वाचा टप्पा असून त्यादृष्टीने उच्च शिक्षणासाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलींना राहण्याची सुविधा उपलब्ध करुन देणारे हे वसतिगृह आहे. अल्पसंख्याक समाजातील मुलींच्या सक्षमीकरणाच्या दिशेने या विभागाने टाकलेले हे एक महत्वाचे पाऊल आहे. अल्पसंख्याक समाजाची सामाजिक, आर्थिक उन्नती होण्यात समाजातील सुशिक्षित मुलीं-महिलांची भूमिका महत्वाची ठरणारी आहे. त्यादृष्टीने बदलत्या काळानुसार कौशल्याधारित शिक्षण देण्यावर विशेष भर द्यावा.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि नंतर देश उभारणीसाठी अल्पसंख्याक समाजाने दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करुन राज्यपाल म्हणाले, तत्कालीन हैद्राबाद संस्थानातील जनतेने दिलेल्या लढ्यात सर्व थरातील लोक सहभागी झाले होते. राज्यपालांनी शोएब उल्लाखान यांच्या कामगिरीचा उल्लेख करुन सांगितले की, त्यांनी कोणत्याही परिणामाची चिंता न करता त्यांची भूमिका मांडली आणि त्यांना त्यांच्या भूमिकेमुळे प्राण द्यावे लागले. स्वातंत्र्य लढ्यात गणेश शंकर विद्यार्थी आणि शोएब उल्लाखान यांच्यासारख्या पत्रकारांनी बजावलेल्या कामगिरीचे स्मरण सर्वांनी विशेषत: तरुण पिढीतील पत्रकारांनी ठेवावे.
श्री. बागडे म्हणाले, शिक्षणाने जगण्याचे शहाणपण प्राप्त होत असते. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तिला शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे. त्यादृष्टीने ग्रामीण भागातील शाळांची गुणवत्ता वृद्धिंगत करण्याकडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे.
श्री. खडसे म्हणाले, अल्पसंख्याकांच्या विकासासाठी विभागामार्फत भरीव प्रयत्न केले जात असून मुलींचे शिक्षणातील प्रमाण वाढण्यासाठी त्यांना 15 हजार रुपये शिष्यवृत्ती, मोफत शिक्षणाची संधी, वसतिगृहाची सुविधा यासारख्या विविध उपयुक्त योजना राबवण्यात येत आहेत. उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना रोजगार, व्यवसाय करण्यासाठी विभागामार्फत पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या सहकार्याने उभारण्यात आलेले 175 मुलींच्या क्षमतेचे हे वसतिगृह एक स्तुत्य उपक्रम असून त्याचे रमाबाई आंबेडकर मुलींचे वसतिगृह असे नामकरण करण्यात येत असल्याचे श्री. खडसे यांनी जाहीर केले.
कार्यक्रमाला आमदार सर्वश्री सतीश चव्हाण, अतुल सावे, इम्तियाज जलिल, जिल्हाधिकारी डॉ.निधी पांडेय, कुलसचिव डॉ.महेन्द्र शिरसाठ यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक कुलगुरु प्रा.चोपडे यांनी केले.