पुणे – अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याला न्यायालयात हजर करत असतानाच म न से च्या नगरसेविकांनी त्याच्या गळ्यात चपलांचा हार घातला. ही घटना आज (शुक्रवारी) दुपारी शिवाजीनगर कोर्टासमोर घडली.मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मारूती सावंत याला आज शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात येणार होते. दरम्यान न्यायालयात हजर करीत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका अस्मिता शिंदे, रुपाली पाटील, अर्चना कांबळे, संगीता तिकोने, युगंधरा चाकणकर, अनिता डाखवे, आशा साने यांनी निदर्शने केली. त्यावेळी अनिता डाखवे, आशा साने या नगरसेविकांनी त्याच्या गळ्यात चपलेचा हार घातला. याप्रकरणी त्यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण संशोधन परिषदेचे व्यवसाथपकीय संचालक, समाज कल्याण विभागाचे माजी संचालक भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) वरिष्ठ अधिकारी मारुती हरी सावंत (वय 58) हे इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या दोन, तसेच तिसरी आणि सातवीमध्ये असलेल्या प्रत्येकी एक अशा चार मुलींसोबत अश्लील चाळे करीत होते. सावंत याचे कुटुंबीय शिवाजीनगर येथे वास्तव्यास असून, ते गेल्या दोन वर्षांपासून सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याच्या हद्दीत फ्लॅटमध्ये एकटेच राहतात. ते आठवड्यातून दोन दिवस येथील फ्लॅटवर येत होते. इमारतीच्या आवारात खेळणाऱ्या मुलींना कधी चॉकलेट, तर कधी पैशाचे आमिष दाखवून घरात बोलावत असे. त्यांना मोबाईल आणि संगणकावर अश्लील चित्रफित दाखवित असे. पीडित मुलींनी शाळेतील समुपदेशक महिलेस त्यांच्यासोबत होत असलेला प्रकार सांगितला. ही बाब भाजपचे नगरसेवक श्रीकांत जगताप यांना सांगितली. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन घडलेली घटना गंभीर असल्याचे लक्षात आणून दिले.सावंत हे पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील हिंगणे परिसरात राहतात. त्यांच्या सदानिकेशेजारी असलेल्या तिसरी पाचवीच्या वर्गातील मुली खेळण्यासाठी इमारतीच्या पार्किंगमध्ये येत असत. या मुलींना चॉकलेट, खाऊचे आमिष दाखवून सावंत त्यांच्या घरात घेऊन जात असे. त्यानंतर मुलींना अश्लील फोटो चित्रफित दाखवून त्यांच्यासोबत अश्लील चाळे करत असल्याचे स्पष्ट झाले आहे, असे पुण्याचे पोलिस आयुक्त सतिश माथूर यांनी सांगितले. न्यायालयाने त्याला ३० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. चपलेचा हार घातल्याप्रकरणी अनिता डाखवे आणि आशा साने या नगरसेविकांना ताब्यात घेण्यात आले आहे.