अलर्ट च्या वतीने “संकल्प करूया – पृथ्वीला वाचवूया” मोहीम
पुणे :
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने “सात अब्ज स्वप्ने – एक पृथ्वी: चला तिची काळजी घेवूया” ही थीम घोषित करण्यात आली होती. याच थीमवर संपूर्ण जगामध्ये आज ५ जुन हा पर्यावरण दिन साजरा होत आहे. याच निमित्ताने अलर्ट संस्थेच्या वतीने आज दि. ५ जुन २०१५ रोजी, सारसबाग पुणे येथे “जागतिक तापमान वाढ” विषयावर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्ष खा. वंदना चव्हाण यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उद्यानामध्ये फिरते प्रदर्शन नागरिकांसाठी लावण्यात आले होते. “संकल्प करूया – पृथ्वीला वाचवूया” या साइन बोर्ड वर नागरिकांनी आपला संकल्प लिहून सह्या या उपक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद दिला.
यावेळी बोलतांना वंदना चव्हाण म्हणाल्या कि, “पर्यावरणाची समस्या ही केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण मानवजातीलाच धोक्यात टाकणारी आहे. निसर्गाने वेळोवेळी आपले रौद्र रूप दाखवून त्याची पूर्वसूचना दिली आहे. आपण वेळीच जागे झालो नाही तर संपूर्ण जगच विनाशाच्या खायीत लोटले जाणार आहे. आपल्या भावी पिढ्यांना सुरक्षित भविष्य द्यायचे असेल तर आजच आपण पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे.”
या उपक्रमासाठी अलर्ट संस्थेचे श्रीराम टेकाळे, बाळकृष्ण राठोडे यांनी विशेष प्रयत्न केले.