पुणे-
पूर्वी स्वारगेट जवळील डॉ . दत्ता कोहिनकर यांच्या विपश्यना केंद्रात आठ दिवस विपश्यना केलेले अरविंद केजरीवाल आता दहा दिवस बेंगलोर येथील निसर्गोपचार केंद्रात उपचार घेणार आहेत. खोकला आणि मधुमेहावर उपचार करून घेण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री तसेच आम आदमी पक्षाचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल येथील जिंदाल निसर्गोपचार केंद्रात दाखल झाले आहेत. दहा दिवस ते या ठिकाणी उपचार घेणार आहेत.
गुरुवारी (ता. 5) दुपारी 12.30 वाजता देवनहळ्ळीनजीकच्या केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन झाले. तेथून ते थेट तुमकूर रोडवरील जिंदाल निसर्गोपचार केंद्रात गेले. “आप‘च्या कार्यकर्त्यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. शिष्टाचारानुसार त्यांच्यासाठी कर्नाटक सरकारने दोन मोटारींची व्यवस्था केली. मात्र, त्यांनी सरकारी मोटारीतून जाण्यास नकार देऊन कार्यकर्त्यांच्या मोटारीतून प्रवास केला. केजरीवाल यांचे आई-वडीलही बंगळुरात आले असून त्यांच्यासोबतच ते राहतील.
. शुक्रवारी (ता. 6) सकाळपासून त्यांच्यावर उपचारास प्रारंभ होईल. योगासन, प्राणायाम, माती, जलचिकित्सेसह विविध प्रकारचे उपचार त्यांच्यावर करण्यात येणार असल्याची माहिती केंद्राच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. बबीना यांनी दिली आहे. दहा दिवसांत केजरीवाल यांचा खोकला कमी होईल, असे निश्चितपणे सांगणे कठीण आहे; पण दीर्घकालीन खोकला आणि मधुमेहावर नियंत्रणासाठी
जीवनपद्धतीत बदल करता येतो. त्यासाठी आवश्यक मार्गदर्शन त्यांना दिले जाणार असल्याचे डॉ. बबीना यांनी सांगितले.आयुर्वेदिक डॉक्टरांकडून केजरीवालांच्या काही तपासण्या करण्यात येतील. त्यानंतर केजरीवालांवर योगा, लॉफ थेरेपी, एक्युपंक्चर, जिम आणि फिजियोथेरेपीसारखी उपचार पद्धती वापरली जाईल. दरम्यान, उपचार सुरु असताना केजरीवाल यांना काही पथ्ये पाळावी लागणार आहेत. केजरीवालांवर पहाटे साडेपाच ते सायंकाळी सात वाजेपर्यंत उपचार सुरु राहातील. या दरम्यान त्यांना चार तासांचा ब्रेक मिळेल. सायंकाळी उपचारानंतर ठीक सात वाजता केजरीवाल यांना जेवण करावे लागेल तसेच रात्री नऊ वाजता झोपावे लागेल. जिंदल नेचर केअर इन्स्टिट्यूटमध्ये उपचारादरम्यान केजरीवालांना पहिल्या आठवड्यात पालेभाज्या, व्हेजिटेबल सूप, ताजी फळे, ज्यूस आणि उकळलेल्या भाज्या खाण्यास दिल्या जातील. दुसर्या आठवड्यात नियमित जेवण दिले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांना बंगळुरात उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार केजरीवाल बंगळुरात दाखल झाले आहेत. अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी सुमारे 110 जाहीर सभांना उद्देशून भाषणे केली होती. या काळात ऍलर्जीक खोकल्याचा त्रास त्यांना आणखीच जाणवू लागला. अखेर निसर्गोपचार घेण्याचे त्यांनी ठरविले. केजरीवाल यांच्या आगमनामुळे निसर्गोपचार केंद्र परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुणालाही परवानगीशिवाय केजरीवाल यांची भेट घेता येणार नसल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले आहे.