पाटणा-
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या प्रचारासाठी बिहारमध्ये दाखल झालेले भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना शुक्रवारी अनपेक्षित प्रसंगाला सामोरे जावे लागले. पाटणा येथील गेस्ट हाऊसच्या लिफ्टमध्ये अमित शहा आपल्या सहकाऱयांसोबत अडकले होते. तब्बल ४० मिनिटांनंतर त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. विधानसभा निवडणुकांमुळे बिहारमधील वातावरण सध्या तापले आहे. लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या वारूला रोखण्यासाठी नितीश, लालूप्रसाद यांची एकजूट होण्यास सुरूवात झाली आहे. तर भाजपसाठी देखील ही प्रतिष्ठेची लढाई असणार आहे. त्यामुळे भाजपची रणनिती आखण्यासाठी अमित शहा बिहारमध्ये दाखल झाले होते. पाटणा येथे भाजपच्या स्थानिक नेत्यांसोबत त्यांनी बैठक घेतली. रात्री उशीरा बैठक संपल्याने ते पाटणा येथील गेस्ट हाऊसवर थांबले. तेथील लिफ्टमधून जात असताना लिफ्ट बंद पडली आणि शहा आपल्या सहकाऱयांसोबत लिफ्टमध्ये अडकले. लिफ्ट दुरूस्त होऊन ते सुखरूप बाहेर येण्यासाठी ४० मिनिटांचा कालावधी गेला. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी तेथे संबंधित व्यक्ती देखील उपस्थित नव्हता. लिफ्टचे दरवाजे पूर्णपणे बंद असल्याने आत मोबाईलला नेटवर्क देखील नव्हते. त्यामुळे आत अडकलेल्यांशी संपर्क देखील साधता येत नव्हता, असे भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष मंगल पांडे यांनी सांगितले. लिफ्ट सुरू करण्याच्या प्रयत्नांना अर्धा तास ओलांडून गेला तरी यश येत नव्हते अखेर अमित शहा यांच्या झेड प्लस सुरक्षा व्यवस्थेतील सीआरपीएफच्या जवानांनी लिफ्टचे दरवाजे तोडून शहा यांना सुखरुप बाहेर काढले.