अमरावती : विभागीय अधिस्वीकृती समितीच्या बैठकीत अध्यक्षपदी अनिल अग्रवाल यांची आज सर्वानुमते निवड करण्यात आली.
प्रसार माध्यमांशी संबंधित व्यक्तींना अधिस्वीकृती पत्र देण्यासंबंधी दिनांक 13 ऑगस्ट 2015 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य अधिस्वीकृती समिती व विभागीय अधिस्वीकृती समिती स्थापन करण्याचे आदेश शासनाने दिले होते. त्याअनुषंगाने विभागीय माहिती कार्यालय येथे उपसंचालक(माहिती) मोहन राठोड यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्ष निवडीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीस समितीचे सदस्य शौकतअली मीर साहेब, प्रदीप देशपांडे, संजय शेंडे, गिरीश शेरेकर तसेच जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार, सहायक संचालक अशोक खडसे व माहिती सहाय्यक विजय राऊत आदी उपस्थित होते.
प्रारंभी श्री. राठोड यांनी सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. बैठकीचे आयोजन अध्यक्ष निवडीसाठी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सदस्य संजय शेंडे यांनी अध्यक्षपदासाठी अनिल अग्रवाल यांचे नाव सुचविले त्यास सदस्य शौकतअली मीर साहेब यांनी अनुमोदन दिले. यानंतर सर्व सहमतीने अध्यक्ष म्हणून अनिल अग्रवाल यांची निवड करण्यात आल्याचे सदस्य सचिव मोहन राठोड यांनी जाहीर केले. अनिल अग्रवाल हे दैनिक अमरावती मंडल वृत्तपत्राचे संपादक आहेत. बैठकीनंतर जिल्हा माहिती अधिकारी सुरेश काचावार यांनी उपस्थित समिती सदस्यांचे आभार मानले.