कलाकारांच्या अभिनयरूपी वंशपरंपरेचा मोठा वारसा सिनेसृष्टीला लाभला आहे. आजवर बऱ्याच स्टारपुत्रांनी आपल्या माता-पित्याच्या पाऊलावर-पाऊल ठेवत सिनेसृष्टीत पदार्पण केले. आपल्या परंपरेला साजेसा अभिनयाचा वारसा जतन करत रसिकांच्या मनावर अधिराज्याही गाजवले आहे. बॉलिवूडच नव्हे तर मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासाची पाने अशा स्टारपुत्रांच्या कारकिर्दीने सजली आहेत. अभेद्य गुप्तेच्या रुपात आता आणखी एक स्टारपुत्र मराठी सिनेरसिकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.
मराठीतील आघाडीचे संगीतकार-गायक-निर्माते-दिग्दर्शक असा नावलौकिक असलेल्या अवधूत गुप्ते यांचा मुलगा अभेद्य गुप्तेयाने रईस ल्ष्करीया प्रोडक्शनच्या ‘एक तारा’ या सिनेमाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे .
अभेद्य गुप्तेने या सिनेमात ओमकार ज्ञानेश्वर लोखंडे नावाच्या एका लहान मुलाची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. यापूर्वी कधीही कॅमेरा फेस न करणारा अभेद्य ‘एक तारा’च्या निमित्ताने प्रथमच कॅमेऱ्यासमोर आला आहे. कांदिवली येथील गुंडेचा एज्युकेशन अकॅडमीमध्ये शिकणारा अभेद्य नऊ वर्षांचा आहे. सुमधूर गीत-संगीतने सजलेल्या या सिनेमात अवधूत यांनी एका गायकाचा प्रवास पडद्यावर रेखाटला आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात स्ट्रगल करत स्टार बनणारा जातीवंत कलाकार आणि त्यानंतर स्टारडम टिकवून ठेवण्यासाठी त्याची चाललेली धडपड असा या सिनेमाच्या कथेचा ग्राफ आहे. आजच्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणारा अभिनेता संतोष जुवेकर या सिनेमात मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत अभिनेत्री तेजस्विनी पंडित मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय उर्मिला निंबाळकर, सागर कारंडे, सुनील तावडे, मंगेश देसाई, चैतन्य चंद्रात्रे आदी कलाकारांच्या या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका आहेत. शैलेश महाडिक यांनी ‘एक तारा’चे कला-दिग्दर्शन केले असून संकलन इम्रान महाडिक व फैझल महाडिक यांनी केले आहे. कलाकारांनी साकारलेल्या पात्रांना साजेशी वेशभूषा अश्विनी कोचरेकर यांनी केले आहे. ३० जानेवारीपासून महाराष्ट्रात सर्वत्र ‘एक तारा’ प्रदर्शित झाला आहे.