इस्लामाबाद – पाकिस्तानमधील एका दहशतवादविरोधी न्यायालयाने देशातील सर्वांत मोठा माध्यमसमूह असलेल्या जिओ टीव्हीचे मालक मीर शकील उर रेहमान, बॉलिवूडमध्ये काम केलेली अभिनेत्री वीणा मलिक व तिच्या पतीस एक “पाखंडी‘ कार्यक्रम प्रसारित केल्याबद्दल 26 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली.
जियो टीव्ही चा मॉर्निंग शो ‘उठो जागो पाकिस्तान’ शाइस्ता लोधी होस्ट करते. या शोमध्ये वीना मलिकच्या मेहंदी आणि लग्नाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यात एका म्युझिक बँडने सुफी गाणे गायले होते. त्यामुळे कट्टपंथी संघटना नाराज झाल्या होत्या. ते गाणे होते, ‘अली के साथ है जहरा की शादी’. त्यावेळी उलेमा पॅनलने तर जियो टीव्ही पाहाणे देखील ‘हराम’ असल्याचे म्हटले होते. एआरवाय न्यूज अँकर आणि ज्येष्ठ पत्रकार मुबाशिर लुकमान यांनी या शो आणि लग्नातील गाण्याचा जोरदार विरोध केला होता.
कोर्टाने 40 पानांचा निकाल देताना सर्व दोषींना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले. मात्र, सर्व दोषी हे पाकिस्तान बाहेर आहेत. रहमान यूएई मध्ये राहातो तर, इतर तिघे दहशतवादी संघटनेच्या धमकीनंतर देश सोडून परागंदा झाले झाले आहेत. टीव्ही चॅनलवर आरोप झाल्यानंतर जियो टीव्हीने माफी मागितली होती, मात्र कट्टरपंथींचे त्यावर समाधान झाले नाही.
पाकिस्तानच्या ईशनिंदा कायद्यात, धार्मिकस्थळांना अपवित्र करणे, त्यांची विटंबना, धार्मिक भावना चेतवणे, पैगंजबर हजरत मोहम्मद यांच्यावर टीका आणि कुराण शरीफ अपशब्द, आक्षेपार्ह कृती करणे या सारख्या गुन्ह्यांसाठी शिक्षेची तरतूद आहे. या कायद्यानुसार कुराण शरीफला नुकसान पोहोचवणार्यांना जन्मठेप. तर पैगंबरांची निंदा करणार्यांना मृत्यूदंडाची शिक्षा आहे. पाकिस्तानमध्ये ईशनिंदा कायदा ब्रिटीशांच्या काळातच अर्थात भारत-पाक फाळणीआधी आंमलात आणला गेला होता.
पाकिस्तानचा कलंकित क्रिकेटर मोहम्मद आसिफसोबतच्या संबंधामुळे वीना मलिक प्रथमच चर्चेत आली. एका नियतकालिकासाठी तिने विवस्त्र पोज दिल्यामुळे पाकिस्ताना आणि भारतातही तिला ओळखले जाऊ लागले होते.
त्यानंतर टीव्ही शो बिग बॉसच्या चौथ्या पर्वात वीना सहभागी झाल्यानंतर भारतात अधिक प्रसिद्ध झाली.