अनेक गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या सुपर पॉवर कंपनीच्या दीपक पारखेने मराठी चित्रपट अभिनेते मंगेश देसाई यांचीही सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. पारखेने निर्माण केलेल्या ‘राजवाडा’ या चित्रपटाचे सहा लाख रुपये मानधन त्याने दिलेच नाही. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (२६ सप्टेंबर) देसाई यांचा जबाब नोंदवला.
मंगेश देसाई ने तक्रार स्वतः हून नोंदविली कि पोलिसांनी त्याच्याकडे याबाबत विचारणा केली आणि त्यानंतर त्याचा जबाब नोंदविला गेला याबाबत काही माहिती मिळू शकली नाहीसुपर पॉवर कंपनीतील घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी दीपक पारखे याने घोटाळा उघडकीस येण्यापूर्वी ‘राजवाडा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभिनेते मंगेश देसाई यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटासाठी देसाई यांचे मानधन आठ लाख रुपये ठरले होते. त्यापैकी एक लाख रुपये चेकद्वारे, पन्नास हजार रोख व चाळीस हजार त्यांच्या बँक खात्यामध्ये देण्यात आले. उर्वरित सहा लाख दहा हजार रुपयाचे चेक त्यांना देण्यात आले आहेत. हा चित्रपट २७ दिवस चित्रीकरण करून पूर्ण करण्यात आला. मात्र त्यांना देण्यात आलेले चेक बाऊंस झाले आहेत. इतर गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहे. त्या अनुषंगाने मंगेश देसाई यांचा जबाब नोंदवल्याची माहिती पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.