लेखक-गोविंद अहंकारी
जिल्हा माहिती अधिकारी, सोलापूर.
‘खेडी ’ हा देशाचा आत्मा आहे. खेड्यांचा विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही. आपल्या देशात ग्रामीण भागातील शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. शेतीद्वारे दरडोई उत्पन्न वाढविले पाहिजे. सुपीक जमीन, पाण्याची व्यवस्था, आधुनिक तंत्रज्ञान, यंत्रसामग्री शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. याबरोबरच शेतातला माल, आधुनिक यंत्रसामग्री याबरोबरच शेतापर्यंत पोहोचण्यासाठी बारमाही शेत रस्त्यांची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सुवर्ण जयंती राजस्व अभियानात लोकसहभागातून शेतरस्त्यांचे काम केल्यास मनरेगामधून खडीकरण, डांबरीकरण करण्याचा संकल्प केला. याला ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळून शेतकऱ्यांच्या विकासाबरोबरच ग्रामीण भागात शेतरस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
अक्कलकोट तालुक्यातील हलहळ्ळी (मैं) ते सातन दुधनी हा 2 कि.मी. अतिशय अरुंद रस्ता… रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण काटेरी झुडपे, खड्डे यामुळे या रस्त्याने पूर्वी शेतात बी-बियाणे, शेतीची अवजारे घेवून जाणे खूपच अडचणीचे होते. पावसाळ्यात तर आणखी परिस्थिती कठीण होते. शेतरस्त्याबाबत जिल्हाधिकारी श्री. मुंढे यांनी गाव नकाशानुसार अतिक्रमित व बंद झालेले रस्ते मोकळे करण्याचे ठरविले. यासाठी प्रांताधिकारी श्रीमंत पाटोळे, मंडल अधिकारी व्ही. एस. मुडके, तलाठी टी.एन. थोरात यांनी या भागातील 30/40 शेतकऱ्यांची बैठक घेवून जिल्हाधिकारी यांची भूमिका समजावून सांगितली. यास सर्व शेतकऱ्यांनी सहमती दिली, सहमती न देणाऱ्यास कायदा व नियम समजावून दिले.
यासाठी सर्वप्रथम कल्याणी हिप्परगी, शावरेणा बसप्पा रोडगे यांनी स्वत:च्या उसाच्या पिकातून जागा दिली. त्यानंतर या परिसरातील सर्वच शेतकरी यामध्ये सक्रियपणे सहभागी झाले. याद्वारे दोन कि.मी.चा 33 फुटाचा रस्ता लोकसहभागातून दोन्ही बाजुंनी चर मारुन त्यातील निघालेल्या माती-मुरुमाने भराव करण्यात आला. अन् शेतरस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. या रस्त्यामुळे शेतीमाल वाहतुकीची चांगली सोय झाली. त्याबरोबरच पूर्वी तोळणूरहून मैंदर्गीला येण्यासाठी दुधनीमार्गे 25कि.मी. यावे लागत असे. परंतु या नवीन रस्त्यामुळे 10 कि.मी. अंतर कमी झाले.
तोळणूर-अक्कलकोट-मैंदर्गी मार्गे येण्याचे अंतरही 15 कि.मी ने कमी झाले व बोराटी स्टेशनजवळ होवून कर्नाटकात जाणे सोईचे झाले. त्यामुळे कर्नाटकात जाण्याचा जवळचा मार्ग झाला. येथून कर्नाटकातील माशाळ- इंडी या गावाला जाणे सोईचे आहे. कर्नाटक-महाराष्ट्रासाठी दळणवळणाच्या सोयीचा रस्ता झाला. त्याचप्रमाणे या मार्गावरील वाहतूक वाढली. मैंदर्गीला आठवडी बाजार, दवाखान्यासाठी लोकांना जाणे सोईचे झाले. या परिसरातील हैद्रा देवस्थानला दर गुरुवारी खूप गर्दी असते, तेथे जाण्यासाठी हा मार्ग सोईचा झाला. त्यामुळे या परिसरातील शेतकरी, नागरिकांनी पूर्वीचा त्रास खूप कमी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला व जिल्हाधिकारी, अधिकारी-कर्मचाऱ्यांना धन्यवाद दिले.
या कामापासून प्रेरणा घेऊन सातन दुधनी-बोरोटी-शंकरलिंग तांड्यापर्यंतचा रस्ताही लोकसहभागातून करण्यात आला. अशाप्रकारे तालुक्यात, जिल्ह्यात एकमेकापासून प्रेरणा घेऊन काम वाढले आहे. जिल्ह्यात 31 जुलै 2015 अखेर 481 रस्त्यांचे अतिक्रमण काढले असून 941.6 कि.मी. रस्ते शेतकऱ्यांना दैनंदिन वापराकरिता सुटसुटीत झाले आहेत.
या बारमाही शेतरस्त्यामुळे शेतकऱ्यांना मशागतीसाठी अवजारांची ने-आण करणे, खते-बियाणे शेतापर्यंत पोहोचविणे, फळे-भाज्या यासारखे नाशवंत माल तत्काळ बाजारपेठेत पोहोचविणे सोईचे झाले. वेळेवर माल बाजारपेठेत न पोहोचल्यामुळे सडून जावून होणारे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी होईल. हे शेतरस्ते त्या भागातील अर्थकारणासाठी निश्चितच महत्वाचे ठरतील व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास निश्चित मदत होईल.