पुणे :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर व साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘डान्स पुणे डान्स 2015’ या नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘राष्ट्रवादी बेस्ट डान्स ग्रुप 2015’ हे पारितोषिक ‘अनबिटेबल डान्स अॅकॅडमी’(वारजे माळवाडी) या संघाने पटकाविले.
स्पर्धेच्या आयोजक खासदार अॅड. वंदना चव्हाण आणि संयोजक सनी मानकर यांच्या हस्ते विजेत्या संघाला पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेस महापौर दत्ता धनकवडे , सुभाष जगताप (सभागृह नेते), बापूराव कर्णे गुरुजी (स्थायी समिती अध्यक्ष) यांचे सहकार्य लाभले. ‘राष्ट्रवादी बेस्ट डान्स ग्रुप 2015’ रोख बक्षिस एक लाख रुपये व मानचिन्ह असे या बक्षीसाचे स्वरूप होते.
स्पर्धेची अंतिम फेरी बालगंधर्व रंगमंदिर येथे दि. 10 फेब्रुवारी रोजी पार पडली. या फेरीत 200 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यातून 80 स्पर्धकांची निवड करण्यात आली. यामध्ये समुह नृत्य स्पर्धेमध्ये लहान गट व मोठा गट, खुला गटामध्ये सोलो डान्स, ग्रुप डान्स, कल्चरल डान्स, क्लासिकल डान्स स्पर्धा घेण्यात आली होती. अंतिम फेरीत मराठी, हिंदी, कोळी गीतांचा सहभाग होता.
या स्पर्धेत सोलो डान्स स्पर्धा प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यास सायकल, ग्रुप डान्स प्रथम विजेत्यास एल. सी.डी. टीव्ही, द्वितीय क्रमांकास 5.1 साऊंड सिस्टिम, तृतीयास 2.1 साऊंड सिस्टिम तर सोलो डान्स प्रथम, द्वितीय क्रमांकास टॅब, अशी बक्षिसे देण्यात आली.
यावेळी शिक्षण मंडळ अध्यक्ष बाबा धुमाळ, लक्ष्मीकांत खाबिया (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), माजी नगरसेवक विकास दांगट, महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर, मनाली भिलारे (पुणे शहर राष्ट्रवादी युवती अध्यक्ष), आनंद रिठे (सामाजिक न्याय विभाग, पुणे शहर अध्यक्ष), अप्पा सुतार, मिलिंद वालवडकर, श्वेता होनराव, राहुल कुमठेकर आणि व्यंकटेश भोंडवे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————