मुंबई-वांद्रे इथल्या ‘मन्नत’ बंगल्यासमोरचा अनधिकृत रॅम्प पाडण्यासाठी आलेल्या सुमारे दोन लाख रुपयांच्या खर्चाचं बिल मुंबई महानगरपालिकेनं बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानला पाठवलं आहे. ही रक्कम जमा करण्यासाठी शाहरुखला सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
आपली व्हॅनिटी व्हॅन उभी करण्यासाठी शाहरुखनं ‘मन्नत’ बंगल्यासमोर रॅम्प बांधला होता. परंतु, परिसरातील नागरिकांसाठी तो अडथळा ठरत होता. त्यामुळे हा अनधिकृत रॅम्प हटवण्याची मागणी जोर धरू लागली होती. मात्र, त्याची दखल ना महापालिका घेत होती, ना शाहरुख. अखेर, खासदार पूनम महाजन यांनी नागरिकांची व्यथा जाणून या प्रकरणात हस्तक्षेप केला होता. त्यांनी महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना पत्र लिहून रॅम्प हटवण्याची मागणी केली होती. त्याची गंभीर दखल घेऊन, पालिका प्रशासनानं लगेचच शाहरुखला नोटीस पाठवली होती. रॅम्प हटवण्यासाठी सात दिवसांची मुदत देऊनही शाहरुखनं काहीच हालचाल न केल्यानं ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी पालिकेच्या एच पश्चिम विभागानं हा रॅम्प जमीनदोस्त केला होता.
या कारवाईनंतर आता मुंबई महापालिका कायद्यातील कलम ४८९(१) अंतर्गत, रॅम्प पाडण्यासाठी आलेला दोन लाख रुपयांचा खर्च पालिका प्रशासन शाहरुखकडूनच वसूल करणार आहे. त्यासाठी ५ मार्चला त्यांनी शाहरुखला नोटीस पाठवली आहे. या संदर्भात शाहरुखशी संपर्क होऊ शकला नाही. परंतु, रॅम्प पाडण्याचा खर्च देण्यासाठी शाहरुख आधीच तयार होता आणि नोटीस मिळताच तो पालिकेला चेक देईल, असं त्याच्या एका निकटवर्तीयानं स्पष्ट केलं आहे. अर्थात, शाहरुखनं सात दिवसांत ही रक्कम न भरल्यास ती त्याच्या मालमत्ता करात समाविष्ट केली जाईल, असं पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय.