पुणे – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या स्कॉर्पिओ (एसयुव्ही) या आठ वर्षांपूर्वीच्या मोटारीला लिलावामध्ये तब्बल नऊ लाख अकरा हजार रुपये मिळाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात अण्णांच्या मूळ राळेगण सिद्धी गावात आज (रविवार) हा लिलाव झाला.
अण्णांच्या महिंद्रा स्कॉर्पिओची तब्बल नऊ लाख अकरा हजार रुपयांना विक्री झाल्याचे अण्णांचे सहायक दत्ता अवारी यांनी सांगितले आहे. अण्णांच्या अगदी जवळचे सहकारी असलेले अतुल लोखंडे यांनी हे वाहन खरेदी केले. लोखंडे यांच्याशिवाय या लिलावामध्ये 14 जण सहभागी झाले होते. अण्णा इनोव्हा मोटार घेणार असल्याची माहिती लिलावानंतर अवारी यांनी दिली आहे. “अण्णांच्या पाठिला त्रास होत असल्याने ते नवीन वाहन घेणार आहेत‘ असेही अवारी यांनी पुढे सांगितले. लिलाव करण्यात आलेली स्कॉर्पिओ अण्णांना पुरस्काराच्या स्वरुपात मिळालेल्या रकमेवर नियंत्रण ठेवणाऱ्या स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी या ट्रस्टच्या मालकीची होती. जनलोकपाल चळवळीच्या वेळी अण्णांनी या स्कॉर्पिओचा वापर केला होता, असेही अवारी पुढे म्हणाले.