लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या मानवतेचा संदेशामुळे मागासवर्गीय समाज मुख्य प्रवाहात आला आहे परंतु , सध्या काही जातीयवादी पक्षाकडून जातीयवादाचे विष पेरण्याचे काम करून समाजात तेढ निर्माण करण्यात येत आहे , असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभाचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले .
महात्मा फुले पेठमधील सावित्रीबाई फुले स्मारकमधील सभागृहात मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र राज्याच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ९५ व्या जयंतीनिमित ” समाजाचा प्रबोधन मेळावा ” व गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव समारंभ ते बोलत होते . मेळाव्याचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले . या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष व माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे , विशेष उपस्थिती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत , माजी राज्यमंत्री चंद्रकांत छाजेड ,मातंग एकता आंदोलनाचे कार्याध्यक्ष नगरसेवक अविनाश बागवे , उपाध्यक्ष अप्पा उकरंडे , शिक्षण मंडळ उपाध्यक्ष नुरुद्दीन सोमजी , नगरसेविका लता राजगुरू , मातंग एकता आंदोलनाचे पुणे शहर अध्यक्ष सुरेश अवचिते , मुख्य समन्वयक विठ्ठल थोरात , महिला आघाडी प्रमुख सुरेखा खंडाळे , संघटनेचे राज्य भरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते . यावेळी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते टेब , अण्णाभाऊ साठे यांचे खंड देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला .
यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले कि , अण्णाभाऊ साठे यांनी समाजव्यवस्थेला बदलण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत योगदान दिले . समाजात विचाराने क्रांती घडवून आणली , समाजाला जनजागृत करण्याचे काम त्यांनी केले . अण्णाभाऊनी महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान विसरता कामा नये . पहिल्या दलित साहित्य समेलनाचे ते अध्यक्ष होते . सध्याच्या माध्यमांनी अतिरिकेंच्या फाशीच्या बातम्या दाखवण्यापेक्षा अण्णाभाऊ साठे यासारख्या महापुरुषांचे जीवनपट दाखवले पाहिजे . मातंग समाज नेहमीच कॉंग्रेस पक्षाच्या पाठीशी उभा राहिला आहे , विरोधी पक्षाच्या नात्याने आपल्या मागण्या प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले .
यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सांगितले कि , महाराष्ट्राला युगपुरुषांनी जे चित्र निर्माण केले ते चित्र तसे उभे राहण्याची गरज आहे परंतु गोळ्वलकर गुरुजींच्या विचाराचे चित्र महाराष्ट्रात उह्जे राहत आहे . शिक्षकांना रामभाऊ म्हाळगी प्रशिक्षण केंद्रात वेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे . सर्व ठिकाणी संघाची लोक भरण्याचे काम चालू आहे . नथुराम गोडसे यांचे मंदिर बांधण्याचे काम चालु आहे . यांचा विचार काय आहे ? या जातीयवादामुळे प्रगती खुंटली आहे . मनुस्मृतीच्या विचारांच्या धारेतून आलेली लोकांची सत्ता व गोळ्वलकर गुरुजीच्या विचार धारेतून आलेली सत्ता समाजाला कोठे नेणार आहे ? अण्णाभाऊ साठेचे साहित्य जागतिक स्तरावर २७ भाषामधून प्रकाशित झाले आहे . अण्णाभाऊनी काटेरी आयुष्यातून निवडुंग फुलविण्याचे काम केले आहे . त्यामुळे अण्णाभाऊच्या विचारांनी प्रेरित असलेले रमेश बागवे यांचे नेतृत्वाची वाट मातंग समाज बघत आहे .
मातंग एकता आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष व माजी गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे यांनी सांगितले कि , मातंग समाजाने लोकसंख्येच्या प्रमाणात स्वंतत्र आरक्षण मागत आहे . मातंग आयोग , भूमिहीन शेतकरी बांधवाना जमीन , सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची मागणी करण्यात येत आहे . समाजाला सामाजिक , राजकीय , शैक्षणिक , आर्थिक न्याय मिळाला पाहिजे . प्रामाणिकपणे वागणारा समाज आहे . समाज बांधव कष्टाचे जीवन जगत आहे . समाजातून सर्वोच्च पदावर जो पर्यंत जात नाही तो पर्यंत काम केले पाहिजे . मातंग समाज आता पिवळ्या झेंड्याखाली एकत्र येत आहे .
मातंग एकता आंदोलनाचे कार्याध्यक्ष नगरसेवक अविनाश बागवे यांनी आपल्या भाषणात सांगितले कि , मातंग एकता आंदोलनाच्या माध्यमातून अडचणी न मांडता कृतीतून समाजासाठी काम केले आहे . त्यासाठी समाजासाठी असणारी तळमळ व्यक्त करण्यासाठी आपण आपली ताकद उभी केली पाहिजे. मातंग एकता आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी जाऊन समाजबांधवांची कामे केली पाहिजेत .
यावेळी माजी राज्यमंत्री चंद्रकांत छाजेड यांनी सांगितले कि , शासनाने मागासवर्गीय बांधवांचे प्रश्न मांडलेले नाही या सरकारला मागासवर्गीय समाजाची जाण राहिलेली नाही . त्यामुळे अछे दिन ज्या वेगाने आलेले आहे, त्याच वेगाने जाणार असून बुरे दिन येणार आहे.
या मेळाव्याचेप्रास्ताविक विठ्ठल थोरात यांनी केले तर सूत्रसंचालन रमेश सकट यांनी केले तर आभार सुजित यादव यांनी मानले . राष्ट्रगीताने मेळाव्याची सांगता झाली .