पुणे:
पुण्याचा विकास आराखडा (डीपी) पुणेकर नागरिकांची प्रतिनिधी असलेल्या महानगरपालिकेला करू न देता राज्य शासनाने ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ ‘राष्ट्रवादी युवक काँग्रेस’, पुणे शहरच्या वतीने आज दि. 3 एप्रिल रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या निवास स्थानाजवळ हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले, अशी माहिती ‘राष्ट्रवादी युवक काँग्रेस’ चे शहराध्यक्ष अजित बाबर यांनी दिली. या एक दिवसीय उपोषणाला सकाळी 11 वाजता प्रारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना अजित बाबर म्हणाले, पुणेकरांच्या पालिकेतील प्रतिनिधींनी तयार केलेला विकास आराखडा राजकीय हेतूने घिसाडघाईने राज्य शासनाने ताब्यात घेतलेला आहे. त्यामुळे विकास आराखड्याच्या प्रक्रियेला विलंब होऊन विपरित परिणाम होणार आहेत. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या निवासस्थानासमोर लाक्षणिक उपोषण करून आम्ही पुणेकरांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहोत. राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राज्य शासनाच्या घिसाडघाईचा निषेध करीत आहेत.
यावेळी दीपक मानकर, रुपाली चाकणकर, श्रीकांत पाटील, सुनील बनकर, श्वेता होनराव, राकेश कामठे, हरीश ओव्हाळ उपस्थित होते.