मुंबई : राज्यातील वीज ग्राहकांना अखंडित वीज आणि चांगली सेवा देण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध असून महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्यांनी या दृष्टीने अधिक कार्यक्षमपणे काम करण्याचे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मुंबईत महावितरणच्या प्रकाशगड मुख्यालयात शुक्रवारी (दि.27) आयोजित आढावा बैठकीत श्री. बावनकुळे बोलत होते.
राज्यातील वीज ग्राहकांना महावितरणच्यावतीने विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्यात अधिक पारदर्शकता आणि गतिशिलता आणण्यासाठी वेगवेगळया उपायोजना करण्यात येत असून या बाबतचा आढावा ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीत घेतला.
राज्य सरकारच्यावतीने शेतकर्यांसाठी सौर कृषिपंप, बेरोजगार अभियंत्यांसाठी फिडर योजना, बेरोजगार अभियंत्यांना प्रायोगिक तत्वावर विविध कामे देण्याचा निर्णय इत्यादी विविध योजना राबविण्यात येत असून त्याच्या अंमलबजावणीला अधिकारी व कर्मचार्यांनी अधिक गती द्यावी व या योजना लोकांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे श्री. बावनकुळे म्हणाले. हे करित असताना आपापल्या भागातील लोकप्रतिनीधींना विश्वासात घ्यावे असेही ऊर्जामंत्र्यांनी सांगितले. ग्राहकांना देण्यात येणारे वीजबिल वाचायला सोपे करणे, नादुरुस्त रोहित्र त्वरित दुरुस्त करण्यासाठी उपविभागीय स्तरावर अद्यावत ट्रान्सफॉर्मर भवनाची उभारणी करणे, सरासरी वीजबिल, वीजचोरीवर आळा घालणे, ग्रामीण भागातील तक्रारींचा त्वरित निपटारा करणे व शेतकर्यांना मोठया प्रमाणात वीजजोडणी देणे इत्यादी बाबत उपायोजना करुन त्याची अंमलबजावणी करावी असे निर्देश देऊन कामात हलगर्जीपणा करणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा ऊर्जामंत्री श्री. बावनकुळे यांनी दिला.
या बैठकीत प्रधान सचिव (ऊर्जा) श्री. मुकेश खुल्लर, महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. बिपीन श्रीमाळी, एम.एस.ई.बी. होल्डींग कंपनीचे संचालक श्री. विश्वास पाठक, श्री. पी.व्ही. पागे, महावितरणचे संचालक सर्वश्री. अभिजीत देशपांडे, प्रभाकर शिंदे इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.

